भारतात लवकर मिळणार कोरोना लस; तिसऱ्या चाचणीबाबत मोठा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

कोरोना लशीला मान्यता देण्यासाठी भारताचा स्वत:चा असा एक बँचमार्क असावा अशी मागणी लस निर्मितीत असणाऱ्या कंपन्यांकडून होत होती

नवी दिल्ली-  भारतीय औषध नियामक मंडळाने कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कोविड लशीमुळे जर 50 टक्के स्वयंसेवकांच्या शरीरात इम्युनिटी तयार झाली असेल, तर अशा लशीला परवानगी देण्यात येईल, असं औषध नियामक मंडळाने Drugs Standard Control Organization (CDSCO) सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच कोरोना लस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने  World Health Organization आणि  यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने US Food and Drug Administration अशाच प्रकारच्या गाईडलाईन्स लशीसंबंधी जून महिन्यात जाहीर केल्या आहेत. 

चीनची होतेय थट्टा; हॉलिवूडमधील क्लिप्स दाखवून केला अमेरिकेवर हल्ल्याचा दावा

कोरोना लशीच्या मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जर 50 टक्के स्वयंसेवकांमध्ये इम्युनिटी तयार झाली, तर या लशीला मान्यता देण्यात येईल. औषध नियामक मंडळाच्या या गाईडलाईन्स WHO आणि US FDA सारख्याच आहेत. सर्वसाधारणपणे 70 टक्के स्वयंसेवकांमध्ये इम्युनिटी तयार झाली, तर लशीच्या वापराला परवानगी दिली जाते. मात्र, काही परिस्थितीत ही मर्यादा 30 ते 70 टक्क्यांपर्यंत आणली जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सोम्या स्वामीनाथन यांनी लशीच्या कार्यक्षमतेची मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत केली जाऊ शकते, असं म्हटलं होतं. 

कोरोना लशीला मान्यता देण्यासाठी भारताचा स्वत:चा असा एक बँचमार्क असावा अशी मागणी लस निर्मितीत असणाऱ्या कंपन्यांकडून होत होती. त्यानंतर हा नविन मसुदा नियम तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. भारतात तीन कोरोना लशींवर मानवी चाचणीचा तिसरा टप्पा पार पडत आहे. अर्धा डझनपेक्षा अधिक लशी प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत. सिरम इन्स्टिट्यूट लस निर्मितीत आघाडीवर आहे. सिरमने अॅस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्ड युनिवर्सिटी सोबत करार केला आहे. कंपनी भारतात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीची चाचणी घेत आहे. झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. 

खाद्यतेलांची आयात मंदावली; पेट्रोल- डिझेलपाठोपाठ ग्राहकांवर नवा भार

दरम्यान, देशभरात कोरोना लशीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. रशियाने कोरोनावर लस निर्माण केल्याचा दावा केलाय. चीनच्या दोन लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहे. अमेरिकेत मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अमेरिकी नागरिकांना 2020 च्या शेवटी कोरोना लस मिळेल, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccine to be available in India soon Big decision about the third test