देशात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले; महाराष्ट्रात सापडले उच्चांकी रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 28 लाख 33 हजार 15 इतकी झाली आहे. तसंच एका दिवसात 978 जणांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा कहर वाढला असून बुधवारी दिवसभरात देशात एकूण 70 हजारांहून अधिक रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसातली ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. गेल्या 24 तासात देशात 70 हजार 101 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामुळे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 28 लाख 33 हजार 15 इतकी झाली आहे. तसंच एका दिवसात 978 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत देशात कोरोनामुळे एकूण 53 हजार 929 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रातही बुधवारी कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. एका दिवसात 13 हजार 165 नवीन रुग्ण सापडले. महाराष्ट्रासह देसातील आणखी सात राज्यांमध्ये त्यांची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झाली. याआधी महाराष्ट्रात 8 ऑगस्टला सर्वाधिक 12 हजार 822 रुग्ण आढळले होते. 

हे वाचा - कोरोनानंतर भारताला आणखी एका आजाराचा विळखा, ICMR चा अहवाल

सध्या देशात कोरोनाचे 6 लाख 88 हजार 162 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 20 लाख 90 हजार 924 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 73.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 19 दिवसांमध्ये फक्त महाराष्ट्रात 2 लाख 7 हजार नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी मुंबईतील रुग्णांची संख्या 19 हजार 331 इतकी आहे. जुलैमध्ये दोन लाख रुग्णसंख्येचा आकडा महाराष्ट्राने 26 दिवसांत गाठला होता. त्यापेक्षा कमी वेळेत वाढती रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. 

महाराष्ट्राच बुधवारी कोरोनामुळे 346 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात 126 मृत्यूची नोंद झाली असून तामिळनाडुत 116 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राशिवाय  आंध्र प्रदेशातही एका दिवसात 9 हजार 742 नवीन रुग्णांची नोंद झाली. उत्तरप्रदेशात 5 हजार 156 नवे रुग्ण आढळले. केरळमध्ये 2 हजार 333 तर पंजाबमध्ये 1693 नवीन रुग्णांची भर पडली. झारखंड 1266, हरयाणा 994, छत्तीसगढ 759 आणि काश्मिरमध्ये 708 रुग्ण सापडले. 

हे वाचा - सरकारी नोकरभरतीसाठी ‘सीईटी’; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

केरळमध्ये पहिल्यांदाच कोरोनाचे एका दिवसात दोन हजारांहून अधिक रुग्ण सापडले. केरळमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 50 हजारांच्या वर पोहोचली आहे. भारतातील चार राज्यांनी 30 लाखांहून अधिक कोरोना टेस्ट केल्या आहेत. उत्तर प्रदेशात 39 लाख, तामिळनाडुत 38 लाख तर महाराष्ट्रात 33 लाख कोरोना टेस्ट झाल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update india maharashtra new cases and death report