Coronavirus Updates : महाराष्ट्रात 24 तासांत वाढले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढतच चालला असून गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात (maharashtra) आढळले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना रुग्ण वाढीचा दर वाढतच चालला असून गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात (maharashtra) आढळले आहेत. सलग दोन दिवस 13 हजारांहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील कमी होत असलेल्या कोरोनारुग्णांच्या आकडेवारीमुळे थोडा दिलासा मिळाला होता. पण तो जास्त वेळ टिकू शकला नाही. कारण, गुरुवारी एका दिवसातं महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन 14 हजार 492 रुग्ण वाढले आहेत. हा राज्यातील आतापर्यंतचा एका दिवसातील रुग्णवाढीचा उच्चांक ठरला आहे. तसेच गेल्या 24 तासांत राज्यात 326 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी राज्यात बुधवारी 13 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, गुरुवारी 14 हजार 492 म्हणजे आतापर्यंतचे 24 तासांतील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. 

राज्यात 13 ते 17 ऑगस्टचे कोरोनाचे कमी झालेले आकडे दिलासादायक होते. याकाळात महाराष्ट्रातील एका दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची वाढ 8 हजारापर्यंत उतरली होती. गुरुवारी एका दिवसात राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी, दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 12 हजार 243 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.37 टक्के झाले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 3.32 टक्के इतका आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 1 लाख 62 हजार491 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक 40 हजार 962 रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. काल एका दिवसात पुण्यामध्ये 3 हजार 544 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 

हे वाचा - कोरोनाला आटोक्यात आणल्यानंतर आता केरळची परिस्थिती हाताबाहेर का?

देशातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून, मागील 24 तासांत कोरोनाचे 68 हजार 898 नवीन रुग्ण मिळाले आहेत. तसेच एका दिवसात 883 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. आता देशातील एकून कोरोना झालेल्या रुग्णांचा आकडा 29 लाख 5 हजार 028 पर्यंत पोहचला आहे. यातील 21 लाख 58 हजार 947 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले असून 6 लाख 92 हजार 028 रुग्णांवर उपचार चालू आहेत. जुलै महिन्यापासून भारतात प्रतिदिन कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढलं होतं.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्टपर्यंत भारतात एकूण 3.26 कोटी कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. काल एका दिवसात देशात 9 लाख 18 हजार 470 कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात 3 कोटी 26 लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus update maharashtra again highest positive patient in one day