कोविशील्डच द्या; स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांनीच दिला नकार

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

देशात कोरोना व्हायरसला रोखण्याच्या दिशेनं आज मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसला रोखण्याच्या दिशेनं आज मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील रेसिडंट डॉक्टरांनी कोव्हॅक्सिन ऐवजी कोविशिल्ड टोचण्याची मागणी केली आहे. 

कोविशील्ड लसीने चाचणीचे सर्व टप्पे पूर्ण केले आहेत. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. केंद्र सरकारने दोन्ही लसी प्रभावी असल्यानं शंका बाळगू नये असंही सांगितलं आहे. 

हे वाचा - पुण्यात बर्ड फ्लू ते देशात कोरोना लसीकरण; वाचा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

दरम्यान, आरएमएलचे रेसिडंट डॉक्टर असोसिएशनने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र लिहून म्हटलं की, आपल्या रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे कोविशील्डच्या तुलनेत जास्त डोस दिले जात आहेत. आम्ही याकडे लक्ष वेधू इच्छित आहे की, रेसिडंड डॉक्टरांना कोव्हॅक्सिनबाबत शंका आहे. याची ट्रायल पूर्ण झालेली नाही आणि मोठ्या संख्येत लसीकरणासाठीही पोहोचलेलं नाही. यामुळे लसीकरण मोहिमेत अपयश येऊ सकतं. म्हणूनच कोव्हॅक्सिन ऐवजी कोविशील्ड देण्यात यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. 

देशात सध्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला मंजुरी मिळाली आहे. याशिवाय इतरही काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलरिया यांनीही लस टोचून घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus vaccination rml doctors says give covishield instead of covaxine