esakal | चिंता वाढवणारी बातमी; कोरोना रुग्णसंख्येत भारत दुसरा

बोलून बातमी शोधा

Corona

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी भारताने एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकले आहे

चिंता वाढवणारी बातमी; कोरोना रुग्णसंख्येत भारत दुसरा
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी भारताने एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. जगातील सहापैकी एक रुग्ण भारतात आढळून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर ९०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 झाली आहे. देशात सध्या कोरोनाचे १२ लाख १ हजार ००७ सक्रिय रुग्ण आहेत. १ कोटी २१ लाख ५६ हजार ५२९ लोकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत १ लाख ७० हजार १७९ लोकांचा बळी घेतला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्ष वयांपुढील व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. आतापर्यंत देशात १० कोटी ४५ लाख २८ हजार ५६५ लोकांना लस देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.  त्यामुळे सरसकट लसीकरण करण्याची मागणी केली जात आहे. 

मोठी बातमी! देशात रशियाच्या 'स्पुटनिक' लशीला परवानगी

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहेत. कोरोना महामारीने सर्वाधित प्रभावित असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ५ लाख ६० हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ३० लाखांच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर साडेतीन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाने हाहाकार माजलावला असून मृत्यूदर मोठा आहे.