कोरोना लस सर्वांना मिळण्यास 2024 उजाडणार - सिरम इन्स्टिट्यूट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनका मिळून कोविशिल्ड लस तयार करत आहेत. गेल्या आठवड्यात या लशीची चाचणी जगभरात थांबवली होती त्यानंतर पुन्हा चाचणीला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली - कोरोनावर लस तयार करण्यासाठी जगभरात अनेक देशांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनका मिळून कोविशिल्ड लस तयार करत आहेत. गेल्या आठवड्यात या लशीची चाचणी जगभरात थांबवली होती त्यानंतर पुन्हा चाचणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या लशीची होत असलेलं उत्पादन हे जगाला लस पुरवण्यासाठी पुरेसं नसल्याचं सिरम इन्स्टिट्यूटने म्हटलं आहे. जगात सर्वांना लस पोहोचवण्यासाठी पुढची 4 ते 5 वर्षे लागतील असं सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. 

फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसच्या लशीचा तुटवडा किमान 2024 पर्यंत जाणवेल. औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन म्हणावं तितक्या वेगानं होत नाही त्यामुळे सर्वांना लस मिळण्यासाठी 4 ते 5 वर्षांचा कालावधी लागेल. गोवर लशीची ज्यापद्धतीनं दोन टप्प्यात लसीकरण मोहिम आखली होती तसं कोरोनाच्या लशीबाबतीत करायचं झालं तर सुरुवातीलाच जगात 15 अब्ज कोटी डोसची आवश्यकता भासेल असंही ते म्हणाले. 

लस निर्माण झाल्यानंतर त्याच्या वितरणाचे काय असाही प्रश्न सध्या सर्वच देशांसमोर आहे. याबाबत सांगताना सिरमने म्हटलं की, भारतात सध्या पुरवठा कऱण्यासाठी जी यंत्रणा आहे ती पाहिली तर देशात 140 कोटी लोकांना लस सुरक्षित पणे कशी पोहोचवता येईल याचाही विचार करायला हवा. सिरम इन्स्टिट्यूट जगातील इतर 5 कंपन्यांच्या मदतीने कोरोना लशीचे 1 अब्ज डोस तयार करणार आहे. यातील 50 टक्के डोस भारतासाठी राखीव ठेवले जातील अशीही माहिती त्यांनी दिली. 

हे वाचा - प्रशांत भूषण यांनी १ रुपयाचा दंड भरला, पण फेरविचार याचिका दाखल करणार

लशीच्या वितरणाबद्दल सांगताना सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला असंही म्हणाले की, एक अब्ज डोस तयार केल्यानंतर त्यातील 50 टक्के भारतात राखीव ठेवले जातील आणि उर्वरीत इतर देशांना दिले जातील. मात्र अमेरिका, युरोपातील देशांनी लशीची मागणी मोठ्या प्रमाणावर केली तर इतर देशांसाठी असलेला साठा कमी होईल. सिरमच्या या लशीची किंमत 225 रुपयांपर्यंत असणार आहे अशीही माहिती याआधी देण्यात आली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूट पुण्यात लशीची निर्मिती करणार असून यासाठी गावी, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत करार केला आहे. या लशीच्या निर्मितीसाठी 15 कोटी अमेरिकन डॉलर्स गेट्स फाउंडेशनच्या स्ट्रॅटेजिक फंडातून दिले जाणार आहेत. सिरमची ही लस 92 देशांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार  असल्याचंही सांगण्यात आलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus vaccine not available to everyone before 2024 says serum