प्रशांत भूषण यांनी १ रुपयाचा दंड भरला, पण फेरविचार याचिका दाखल करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 14 September 2020

भूषण न्यायालयाविरोधातील आपला आक्रमकपणा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अवमानाप्रकरणी (Contempt Of Court) दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी शिक्षेचा १ रुपया दंड सोमवारी न्यायालयाच्या रजेस्ट्रीमध्ये भरला. असे असले तरी भूषण न्यायालयाविरोधातील आपला आक्रमकपणा कायम ठेवणार असल्याचं कळत आहे. न्यायालयात दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दंड भरला याचा अर्थ असा नाही की मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला आहे. आजच याप्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. 

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य संकटात आले आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना अडचणीत आणलं जात आहे. सत्त्यासाठी लढाई म्हणून एक निधी बनवला जात आहे. यात जमा होणारा पैसा अशा लोकांसाठी वापरला जाईल, असंही भूषण म्हणाले. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना रोखण्यासाठी किंवा त्यांना गप करण्यासाठी प्रत्येक मार्ग अवलंबला जात आहे. याच मुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता उमर खालीद याला अटक करण्यात आली आहे. याच बरोबर सीताराम येचुरी आणि अन्य नेत्यांनाही सतावले जात आहे, असंही भूषण यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. 

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

काय आहे प्रकरण?

जेष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस ए बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयावर टीपण्णी केली होती. अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने भूषण यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत १ रुपयांचा दंड भरण्याचा किंवा तीन महिन्याचा तुरुंगवास आणि तीन वर्षांसाठी वकिली सोडण्याची शिक्षा सुनावली होती. भूषण यांनी १ रुपयांचा दंड भरला आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाप्रकरणी फेरयाचिका दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Bhushan paid a fine of Rs 1 but will file a reconsideration petition