रेल्वे प्रवासात आता कॉटनचे नॅपकिन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जुलै 2018

रेल्वेच्या वातानूकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. रेल्वे मंडळाच्या ताज्या आदेशानुसार या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या नॅपकिनची (टॉवेल) जागा आकाराने छोटे व कॉटनचे टॉवेल घेणार आहेत व अंथरूण-पांघरूणेही पूर्वीप्रमाणे नव्हे; तर नायलॉनची असतील. रात्री थंडी वाजू लागली तर जादा पांघरूण घ्यायचे असल्यास प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. 

नवी दिल्ली - रेल्वेच्या वातानूकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. रेल्वे मंडळाच्या ताज्या आदेशानुसार या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या नॅपकिनची (टॉवेल) जागा आकाराने छोटे व कॉटनचे टॉवेल घेणार आहेत व अंथरूण-पांघरूणेही पूर्वीप्रमाणे नव्हे; तर नायलॉनची असतील. रात्री थंडी वाजू लागली तर जादा पांघरूण घ्यायचे असल्यास प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. 

रेल्वेचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने रेल्वेचे प्रयत्न व सुधारणा असल्याचाही दावा रेल्वेने पुन्हा केला आहे. सध्या रेल्वेला प्रत्येक नॅपकिनमागे साडेतीन रुपयांहून जास्त खर्च येतो. मात्र त्यांच्या सध्याच्या आकारामुळे त्यांचा पूर्ण वापर होऊ शकत नाही. वारंवार सूचना देऊनही अगदी शताब्दी-राजधानी एक्‍स्प्रेसने प्रवास करणारे अनेक बहाद्दर हे नॅपकिनही बॅगेत घालून बरोबर नेतात, असाही अनुभव येत असतो. यावर रेल्वेने या नॅपकिनचा आकार व कापड दोन्ही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाने सर्व विभागीय व्यवस्थापकांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात त्यांच्या त्यांच्या विभागातील रेल्वेगाड्यांत छोट्या नॅपकिनचा वापर कटाक्षाने सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. नवे कॉटनचे नॅपकिन रेल्वे घाऊक दराने खरेदी करणार असल्याने त्यांचा खर्चही कमी येईल, असेही रेल्वे मंडळाचे म्हणणे आहे. रेल्वेतर्फे दिल्या जाणाऱ्या बेडिंगची धुलाई व स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर आता नायलॉनची नवी पांघरूणे वापरात येणार आहेत.

Web Title: Cotton napkins to replace face towels on trains