esakal | Fact Check : Covid 19 : काय करावं आणि काय नको? व्हायरल लिस्टबाबत ICMR चा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19 Advisory Fact Check

सध्या सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात काय करावं आणि काय करू नये याबाबत 21 पॉइंटची एक यादी व्हायरल होत आहे.

Covid 19 : काय करावं आणि काय नको? वाचा व्हायरल मेसेजचं सत्य

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात (India) सध्या कोरोनाच्या (Covid 19) दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दरदिवशी जवळपास 4 लाख इतके नवे रुग्ण आढळत आहेत तर 3 हजारांहून जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावरून कोरोनाबद्दलच्या अनेक अफवाही पसरत आहेत. आता आयसीएमआरने (ICMR) अशाच एका अफवेबद्दल माहिती दिली आहे. सध्या सोशल मीडियावर कोरोनाच्या काळात काय करावं आणि काय करू नये याबाबत 21 पॉइंटची एक यादी व्हायरल होत आहे. आयसीएमआरने ही यादी फेक असल्याचं स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरने म्हटलं की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली यादी, नियमावली (Covid 19 Advisory) ही आम्ही प्रसारीत केलेली नाही. त्यातील माहिती खोटी आहे.

व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असं म्हटलं आहे की, पुढच्या दोन वर्षांसाठी परदेशात प्रवास करू नका. वर्षभर बाहेरचं काही खाऊ नका. खोकला असलेल्या व्यक्तींपासून दूर रहा, किमान वर्षभर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. इतकंच काय तर चपलासुद्धा घरात घेऊ नका असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: राहुल गांधींचे पुन्हा PM मोदींना पत्र; केंद्र सरकारला दिला सल्ला

फक्त खाणं, फिरणं याबाबतच नाही तर संबंधित मेसेजमध्ये तुम्ही घरातून बाहेर बेल्ट, रिंग, घड्याळ इत्यादी घालू नका असंही म्हटलं आहे. यामध्ये कोरोना ही आपत्ती लवकर जाणार नाही असं सांगताना लोकांनी पुढच्या सहा ते 12 महिन्यात काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं आहे. तसंच हे सर्व आयसीएमआरकडून सांगण्यात आल्याचा दावाही केला आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट असून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. याचा ताण देशातील आरोग्य यंत्रणेवर पडत असून अनेक वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. भारतात शुक्रवारी 4 लाख 14 हजार 188 नवीन रुग्ण आढळले तर दिवसभरात 3 हजार 915 जणांचा मृत्यू झाला.