ऑगस्टपर्यंत 7.43 कोटी लोकांना कोरोना झाल्याची शक्यता; दुसऱ्या सिरो सर्व्हेचा रिपोर्ट

mkeN
Thursday, 26 November 2020

देशात आतापर्यंत 92 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी जवळपास 86 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी दिल्ली - देशातील दुसऱ्या सिरो सर्व्हेचा रिपोर्ट आला असून त्यातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दहा वर्षांच्या वरील जवळपास 6.6 टक्के लोक कोरोनाबाधित झाले होते तर 7.1 टक्के वृद्धांमद्ये कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडी सापडल्या आहेत. दहा वर्षांच्या वर वय असलेल्या 15 पैकी एकाला कोरोना झाला होता. तर फक्त ऑगस्ट महिन्यापर्यंत देशात 7.43 कोटी लोकांना कोरोना झाल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

सर्व्हेच्या निष्कर्षानुसार जेव्हा 26 ते 32 कोरोना रुग्णांपैकी टेस्ट करून फक्त एकाच रुग्णाची ओळख पटवली जात होती. याआधी पहिल्या सर्व्हेमध्येसुद्धा ही संख्या जास्त होती. मात्र टेस्टिंग वाढल्यानं यात घट झाली होती. मे ते ऑगस्ट महिन्यांच्या दरम्यान वृद्धांमध्ये संसर्गाचे प्रमाण दहापट वाढले होते. हा सर्वे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करण्यात आला होता. जिथं पहिला सिरो सर्व्हे केला होता त्या 21 राज्यांमधील 70 जिल्हे आणि 700 गावांमध्ये करण्यात आला. त्यामध्ये सर्व्हेची सँपल साइज 29 हजार 82 इतकी होती. 

हे वाचा - कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आल्याने रेडझोनमधील व्यवहारांवर बंधने

दिल्लीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना सर्व्हेचे रिझल्ट आले आहेत. दिल्लीमध्ये 20 ते 24 नोव्हेंबर या काळात घरोघरी जावून सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार एकूण 13 हजार 516 लोकांमध्ये लक्षणं दिसली तर 8 हजार 413 लोक यांच्या संपर्कात आले होते. त्यांची ओळख पटवण्यात आली होती. यामधील आतापर्यंत 11 हजार 790 जणांमध्ये लक्षणं असलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 6 हजार 546 लोकांची चाचणी करण्यात आली. यात एकूण 1 हजार 178 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. म्हणजेच हे प्रमाण 6.42 टक्के इतकं आहे. 

हे वाचा - ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनबाबत का उपस्थित केली जातेय शंका?

दिल्लीतील 11 जिल्ह्यांमध्ये सर्व्हे करण्यासाठी एकूण 8 हजार 968 जणांची टीम काम करत होती. प्रत्येक टीममध्ये 3 जण होते. हा सर्व्हे दिल्लीतील 4 हजार 456 कंटेन्मेंट झोन आणि जास्त लोकसंख्या असलेल्या भागात, बाजारांमध्ये करण्यात आला होता. 

देशात आतापर्यंत 92 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी जवळपास 86 लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे देशातील 1 लाख 35 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 second sero survey report may be more than 7 crore people positive