esakal | अनलॉक 4 मध्ये काय सुरू होणार? केंद्र सरकार लवकरच घेणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Unlock 4

देशात 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात जिम आणि योगाभ्यास संस्थांना मंजुरी देण्यात आली होती. तसंच कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरु ठेवण्याचे आदेशही दिले होते.

अनलॉक 4 मध्ये काय सुरू होणार? केंद्र सरकार लवकरच घेणार निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी देशात मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आलं आहे. जुनपासून लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणत सरकारने अनलॉकला सुरुवात केली होती. आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनलॉक 4 ची सुरुवात सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. या काळात शाळा आणि कॉलेज बंदच ठेवले जाऊ शकतात. वेगवेगळ्या परीक्षांसाठी परवानगी मिळाल्यानं शाळा, कॉलेज उघडले जातील असं म्हटलं जात होतं. मात्र अनलॉक 4 मध्येही सरकार शाळा, कॉलेज सुरु करण्यास परवानगी देण्याची शक्यता नाही. तसंच या टप्प्यातही कंटेनमेंट झोनमध्ये कडक निर्बंध लागू राहतील. याशिवाय मेट्रो सेवेला हिरवा कंदील मिळण्याचीही शक्यता आहे. अनलॉक 4 बाबत गृह मंत्रालयाकडून लवकरच सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाऊ शकते. 

देशात 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात जिम आणि योगाभ्यास संस्थांना मंजुरी देण्यात आली होती. तसंच कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरु ठेवण्याचे आदेशही दिले होते. यात रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली होती. गेल्या टप्प्यात सरकारने सिनेमागृहे उघडण्यास मंजुरी दिली नव्हती. चौथ्या टप्प्यातही हे निर्बंध कायम राहू शकतात. तसंच सध्या तरी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे आणि रेल्वे सेवा सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

मार्च महिन्यात लॉकडाउन केल्यानंतर सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार यावर पूर्णपणे बंदी घातली होती. तसंच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंधने घालण्यात आली होती. सरकारने अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या नियमांसह शॉपिंग मॉल आणि धार्मिक स्थळांना परवानगी दिली होती. 

हे वाचा - सोनिया गांधीच तुर्तास काँग्रेसच्या अध्यक्षपदी; जाणून घ्या १० मुद्दे

कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधीच देशात केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा केली होती. यानंतर सरकारने जूनमध्ये थोडी शिथिलता आणत अनलॉक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्याचा चौथा टप्पा आता सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. दरम्यान, महराष्ट्रासह विविध राज्यात सध्या असलेल्या सणांमुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठड्याच्या शेवटी चौथ्या अनलॉकला सुरुवात होऊ शकते. अद्याप काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यानं अशा ठिकाणी नियम कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. 

राज्यातील लॉकडाउनचा निर्णय बुधवारी होणार?
महाराष्ट्रातही कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं विविध पातळीवर प्रयत्न केले. लॉकडाऊनमुळे आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात अटी शिथिल करण्यात आल्या. आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन कशाप्रकारे असेल अशी चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊनचे आणखी काही नियम शिथिल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन प्रश्नी विचारविनिमय होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.