esakal | कोरोनाचा उद्रेक थांबेना! दिवसभरात जवळपास 3 लाख नवे रुग्ण, 2 हजार मृत्यू

बोलून बातमी शोधा

corona

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढ बघायला मिळाली. सोमवारी 57 हजारांहून अधिक रुग्ण होते.

कोरोनाचा उद्रेक! 24 तासात जवळपास 3 लाख रुग्ण, 2000 मृत्यू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

Corona Updates : नवी दिल्ली - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. बेड्स, औषधे, ऑक्सिजन यांचा तुटवडा भासत असून कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोनाचा हाहाकार देशात असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असावा, असा सल्ला राज्यांना दिला होता. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. मंगळवारी (ता. 20) तब्बल 2 लाख 95 हजार 41 नवीन रुग्ण सापडले असून 24 तासात 2 हजार 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी पोलिस दोषी

मंगळवारी दिवसभरात 1 लाख 66 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत भारतातील 1 कोटी 56 लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 कोटी 32 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 82 हजार इतका झाला आहे. सध्या देशात 21 लाख 50 हजार कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मृत्यूच्या आकडेवारीत भारताने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. सध्या मृत्यूबाबत ब्राझील दुसऱ्या आणि अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्राझीलमध्ये सध्याच्या लाटेत दर दिवशी 1500 लोकांचा मृत्यू होत आहे, तर अमेरिकेत हीच आकडेवारी 400 ते 600 च्या दरम्यान आहे. भारतात मंगळवारी 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी वाढ बघायला मिळाली. सोमवारी 57 हजारांहून अधिक रुग्ण होते. तर मंगळवारी दिवसभरात 62 हजार नवीन रुग्ण सापडले. गेल्या 24 तासात राज्यात 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 61 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 32 लाख 13 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उत्तर प्रदेशातही कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यात मंगळवारी 29 हजार 574 रुग्ण सापडले. तर 162 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय दिल्लीत 28 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत मृत्यूचे प्रमाण उत्तर प्रदेशापेक्षा जास्त आहे. दिल्लीत मंगळवारी दिवसभरात 277 रुग्णांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: अग्रलेख : लसीकरणाला बूस्टर डोस!

जगात आतापर्यंत 14 कोटी 26 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 30 लाख 43 हजारांहून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. तर 12 कोटी 11 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. जगात सध्या 1 कोटी 84 लाख सक्रीय रुग्ण असून यातील एक लाख 8 हजार 184 रुग्णांची प्रकृती ही गंभीर आहे तर जवळपास दोन लाख रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.