COVID-19 Vaccination : कोविन पोर्टलला तुफान प्रतिसाद; दोन दिवसांत लाखोंची नोंदणी

टीम ई-सकाळ
Tuesday, 2 March 2021

कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांसाठी लसीकरण खुले झाल्यानंतर नागरिकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांसाठी लसीकरण खुले झाल्यानंतर नागरिकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे. कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी झुंबड उडाली असून केवळ दोन दिवसात ५० लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

धक्कादायक! शाळेच्या हॉस्टेलमध्ये करोनाचा कहर, ५४ विद्यार्थी आढळले पॉझिटिव्ह

कोविड योद्ध्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारने १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरु केलं आहे. मात्र, यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांनाच लस घेता येणार आहे. अपवादात्मक बाब म्हणजे विशिष्ट गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ४५ ते ५९ वर्षे वयाच्या नागरिकांनाही ही लस घेता येणार आहे. मात्र, ही लस घेण्यासाठी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. सरकारने हे कोविन पोर्टल कोरोना लसीकरण मोहिमेसाठी तयार केलं आहे.  

तांदूळ शिजवून खाण्याची गरजच नाही!; तेलंगणातील शेतकऱ्याचा महत्वूपूर्ण शोध

आरोग्य मंत्रालयानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत शर्मा यांनी सांगितलं, "कालपासून कोविन पोर्टलवर ५० लाख जणांनी  नोंदणी केली आहे." तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, "देशातील जवळपास दीड कोटी लोकांचं अद्यापपर्यंत लसीकरण पूर्ण झालं आहे. यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम सुरु झाल्यापासून एका दिवसात २ लाख लोकांना लस देण्यात आली आहे." 

प्रशांत किशोर आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार

दरम्यान, आज दुपारी १ वाजेपर्यंत एकूण १.४८ कोटींपेक्षा अधिक डोस देण्यात आले, यांपैकी २.०८ लाख डोस हे ४५ ते ५९ वयोगटातील विशिष्ट आजारी लोक आणि ६० वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशात अद्याप कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असून ही स्थिती रोखण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना केल्या जात आहे, असे भूषण यांनी सांगितले. यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पौल यांनी जनतेला कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची तसेच गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन केलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID 19 vaccination registrations on Co WIN platform cross 50 lakh says Govt