देशातील अधिक संवेदनशील 35 जिल्ह्यात 17 महाराष्ट्रातले; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ३५ जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

नवी दिल्ली - देशातील पाच राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ३५ जिल्ह्यातील कोरोना संसंर्ग आणि मृत्युदराचे प्रमाण गंभीर असल्याने संबंधित जिल्ह्यातील कंटन्मेंट झोनचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि चाचण्या वाढवण्याचे निर्देश आज केंद्राने दिले आहेत. युद्धपातळीवर उपाय राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ३५ जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या भागात ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यावर भर देणे,ॲटिजेन चाचणीचे प्रमाण वाढवावे असे निर्देश दिले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्य सचिवांशी व्हिसीद्वारे चर्चा केली. या पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण ३५ जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असल्याने तेथे आणखी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. संबंधित जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी राबवण्यात येणारे उपाय अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी त्याचा आढावा घ्यावा आणि त्यात सुधारणा कराव्यात असेही जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला सांगण्यात आले. या वेळी राज्य सचिवांनी राज्याच्या स्थितीची आणि उपायांची माहिती सादर केली. या बैठकीत कोरोनाबाधित जिल्ह्याचे आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

हे वाचा - covid-19: भारताने ब्राझीलला टाकले मागे; आता फक्त अमेरिका आपल्या पुढे

होम आयसोलेशनमधील रुग्ण आणि कोविड सेंटरमध्ये नव्याने दाखल झालेल्या रुग्णांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करण्याबाबत सजग राहवे, असे सांगण्यात आले. या वेळी पुढील एक महिन्यात राबवण्यात येणाऱ्या उपायांवर चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्ह्याधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्ड, कोविड सेंटर, आयसीयू वॉर्ड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची माहिती दिली.

हे वाचा - सलाम! रुग्णसेवेसाठी धावला वर्दीतला डॉक्टर; पोलिस अधीक्षकाने जिंकली मने

देशातील ३५ जिल्हे संवदेनशील असून सर्वाधिक 17 एकट्या महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय दिल्लीतील 11 जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे. पश्‍चिम बंगाल बंगालमधील कोलकता, हावडा, नॉर्थ २४ परगणा आणि चोवीस साऊथ परगना या जिल्ह्यातील परिस्थिती संवेदनशील आहे. तर महाराष्ट्रात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, सोलापूर, सातारा, पालघर, औरंगाबाद, नांदेड, धुळे या जिल्ह्यातील परिस्थिती अधिक संवेदनशील असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. गुजरातमधील सुरत तर पुदुच्चेरीतील पुदच्चेरी आणि झारखंडमधील इस्ट सिंघभूम या जिल्ह्यांचाही यादीत समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid situation total 35 sensitive district in india health ministry report