Positive Story : लॉकडाऊनच्या फावल्या वेळेचा असाही सदुपयोग; सृजनशील हस्तकलेची नवनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

रिकाम्या वेळेचाही छानपैकी सदुपयोग करता येऊ शकतो आणि काहीतरी सृजनशील निर्माण करत आनंद घेता येऊ शकतो.

तमिळनाडू : कोरोना नावाचा एक विषाणू आला आणि अचानक सारा देशच बंद करावा लागला. असं काहीसं घडेल, याची तसूभरही कल्पनादेखील आपल्याला नव्हती. सारं काही बंद होऊन आपल्यालाही बंद घरातच तीन-चार महिने रहावं लागेल, हे कुणाच्याही खिजगणतीतही नव्हतं. मिळालेल्या वेळेचं करायचं काय, असा प्रश्न बरेचजणांना पडला असेल अथवा आता हा भलामोठा वेळ घराबाहेर न पडता घरातच बसून कसा सत्कारणी लावू, या प्रश्नाने अनेकांचं डोकं बधीर झालं असेल. मात्र, या रिकाम्या वेळेचाही छानपैकी सदुपयोग करता येऊ शकतो आणि काहीतरी सृजनशील निर्माण करत आनंद घेता येऊ शकतो, याचंच एक उदाहरण तमिळनाडूमध्ये दिसून आलंय. 

हेही वाचा - Corona Update : कोरोना प्रादुर्भावाचा 70 लाखांचा टप्पा; गेल्या 24 तासात 73,272 नवे रुग्ण

तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरातील एका कॉलेजवयीन युवतीने कोरोना लॉकडाऊन काळातील वेळेचा सकारात्मक उपयोग केला आहे. आपल्या लहानपणीच्या छंदांना पुन्हा एकदा ताजेतवाने करत तिने हा वेळ सत्कारणी लावला आहे. तिने स्वत:च्या कलाकौशल्याचा वापर करून काही हस्तकलेचे नमुने बनवले आहेत. या युवतीचे नाव जेनिफर असे आहे. जेनिफरने घराला सुशोभित करणाऱ्या वस्तू बनवल्या आहेत. विशेष म्हणजे या वस्तू तिने कचऱ्यातून आणि टाकाऊ वस्तूचा वापर करुन साकारल्या आहेत. टाकाऊ पासून टिकाऊ असं काहीतरी बनवणं आणि त्यातून घराला अधिक सुशोभित करतील अशा वस्तूंची निर्मिती करणं या तिच्या कलेला सोशल मीडियातून चांगलीच कौतुकाची थाप मिळत आहे. तिच्या या अविरत प्रयत्नांमुळे तरुण अशी होतकरु उद्योजक म्हणून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

हेही वाचा - रेल्वे रिझर्व्हेशनच्या नियमांत आजपासून महत्वाचे बदल; प्रवाशांना होणार फायदा

याबाबत तिच्याशी बातचित केली असता ती म्हणाली की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला. घरातून बाहेर पडण्यास मज्जाव असल्याने घरी बसून बसून मला कंटाळ आला होता. म्हणून मला ही कल्पना सुचली. टाकाऊ कचऱ्यापासून काहीतरी हस्तकला बनवता येऊ शकतात या कल्पनेमुळे मला नवा उत्साह मिळाला. मी टाकाऊ बॉटल्स गोळ्या करायला सुरूवात केली. आणि या बॉटल्सना मी टिश्यू पेपर, पिस्त्याची टरफले अशा सगळ्या टाकाऊ कचऱ्यानीच सजवायला सुरवात केली आणि यातून मला काहीतरी नवनिर्मिती करता आली ज्याचा मला आनंद आहे. 2020 हे वर्ष मला माझ्या सृजनशीलतेसाठी म्हणून आठवायला हवे, असं मला वाटत होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: craftwork out of waste Madurai Jeniffer used COVID19 lockdown for creativity