PFI चे देशविरोधी कृत्य; १२ जिल्ह्यांतील ८० जणांना अटक

पोलिसांनी पीएफआय विजापूर जिल्हा युनिटचे अध्यक्ष अशफाक जमखंडी यांच्या घरावर पहाटे छापा टाकून त्यांना अटक केली
PFI
PFISakal-

बंगळूर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरुद्धची कारवाई सुरू ठेवत, कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी (ता. २७) पहाटे दोन टप्प्यात छापे टाकले आणि राज्यभरात सुमारे ८० जणांना अटक केली. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले. बागलकोट, कोलार, बेळगाव, चित्रदुर्ग, कोप्पळ, चामराजनगर, रायचूर, विजापूर, गुलबर्गा, बिदर, रामनगर, यादगिरी जिल्ह्यांत अधिकाऱ्यांनी ८० जणांना अटक केली.

पोलिसांनी गेल्या आठवड्यात बंगळूर आणि मंगळूर शहर, दक्षिण कन्नड जिल्हा, शिमोगा, कोप्पळ, दावणगेरे, उडुपी, म्हैसूर आणि गुलबर्गा येथे पीएफआय सदस्यांच्या १८ ठिकाणी छापे टाकून १५ पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केली होती. पीएफआयवर दहशतवादी कारवायांना निधी पुरवणे, शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी शिबिरे आयोजित करणे, अतिरेक्यांना चिथावणी देणे आणि तोडफोडीच्या कृत्यांमध्ये गुंतणे, असे आरोप आहेत.

पोलिसांनी पीएफआय विजापूर जिल्हा युनिटचे अध्यक्ष अशफाक जमखंडी यांच्या घरावर पहाटे छापा टाकून त्यांना अटक केली. तर बागलकोटमध्ये शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पीएफआय संघटनेच्या सातजणांना जिल्ह्यात अटक केली. बिदरमध्ये पीएफआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआय संघटनेचे जिल्हा सचिव शेख मकसूद यांना पोलिसांनी अटक केली असून दोन स्वतंत्र पथके तयार करून सकाळी कारवाई करण्यात आली. गुलबर्ग्यामध्ये पीएफआयचे जिल्हा मीडिया प्रवक्ते मजहर हुसैन यांना गुलबर्गा पोलिसांनी सकाळी अटक केली. काही दिवसांपूर्वी पीएफआय जिल्हा युनिटचे अध्यक्ष एजाज अली यांना एनआयए अधिकाऱ्यांनी अटक केली होती.

पीएफआयचे जिल्हाध्यक्ष कफील अहमद आणि जिल्हा सचिव सुहेब खान यांना पोलिसांनी चामराजनगरमधून अटक केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोघांना अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक टी. पी. शिवकुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, रामनगर येथे १० हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, तर पोलिसांनी मंगळवारी पहाटे इझुरू, टिपू नगर आणि रहमानिया नगर येथे छापे टाकून पीएफआय संघटनेच्या दहाहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली.

यादगिरी पीएफआय जिल्हा युनिटचे अध्यक्ष बंदेनवाज गोगी आणि कार्यकर्ते मुहम्मद हसिम पटेल गोगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रायचूरमध्ये जिल्हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पीएफआयचे माजी अध्यक्ष इस्माईल यांना सदर बाजार पोलिस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आणि पीएफआय सचिव असिमुद्दीन यांना ताब्यात घेण्यात आले. कोप्पळचे मुख्य संघटक रसूल मोहम्मद, राज्य सरचिटणीस सय्यद सरफराज हुसेन यांना ताब्यात घेण्यात आले. कोलारमध्ये अधिकाऱ्यांनी छापा टाकून सात पीएफआय नेत्यांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com