नक्षलवाद्यांना ठेचणार नारीशक्ती; CRPF च्या कोब्रा पथकात 34 महिला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 February 2021

घनदाट अरण्यामध्ये नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी आता देशाच्या रणरागिनी मैदानात उतरल्या आहेत. जंगलातील युद्धतंत्रामध्ये नेहमी आघाडीवर असणाऱ्या कोब्रा या कमांडो पथकामध्ये आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३४ महिला कर्मचाऱ्यांचा अधिकृत समावेश करण्यात आला.

गुरुग्राम - घनदाट अरण्यामध्ये नक्षलवाद्यांसोबत दोन हात करण्यासाठी आता देशाच्या रणरागिनी मैदानात उतरल्या आहेत. जंगलातील युद्धतंत्रामध्ये नेहमी आघाडीवर असणाऱ्या कोब्रा या कमांडो पथकामध्ये आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३४ महिला कर्मचाऱ्यांचा अधिकृत समावेश करण्यात आला. लवकरच हे पथक नक्षलविरोधी मोहिमेसाठी तैनात केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गुप्तचर संस्थांनी माहिती दिल्यानंतर त्याआधारे जंगलामध्ये लष्करी मोहिमा राबविण्याची जबाबदारी या पथकाकडे असते. २००९ मध्येच ‘सीआरपीएफ’अंतर्गत या पथकाची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत कोब्रा पथकामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचाच भरणा केला जात असे. या पथकामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असावे लागते. सर्वसाधारणपणे नक्षली हिंसाचारानेग्रस्त असणाऱ्या भागांमध्येच या पथकाची नियुक्ती केली जाते. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थानिक बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोबरा पथकेच तैनात करण्यात आली आहेत.

कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ; राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा

महिलांच्या क्षमतेचे कौतुक
या समावेशानिमित्त कादरपूर खेड्यातील छावणीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ‘सीआरपीएफ’चे महासंचालक ए.पी. माहेश्‍वरी उपस्थित होते. लिंग आधारित भेदभावाच्या समूळ उच्चाटनासाठी ही निवड खूप महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाल्या. सहा बटालियनमधील निवडक महिला कर्मचाऱ्यांची कोबरा पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदी राज्यसभेत बोलणार? ठरणार पहिलेच पंतप्रधान

कठोर प्रशिक्षण दिले जाणार
कोबरा पथकामध्ये समाविष्ट झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या कठोर भरतीपूर्व प्रशिक्षणाला सामोरे जावे लागेल, त्यानंतर त्यांची नियुक्ती ही छत्तीसगडमधील सुकमा, दंतेवाडा आणि विजापूर सारख्या भागांत करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी माहेश्‍वरी म्हणाले की, ‘‘ कोबरा पथकातील महिला या देशातील असंख्य तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरतील. या महिलांनी शक्ती केवळ स्नायूंमध्येच नसते तर ती डोक्यात असते हे दाखवून दिले. देशातील युद्धतंत्राचे स्वरूप बदलले आहे. एखाद्याचे मत परिवर्तन घडवून आणण्यासाठी आता देशाच्या सीमा ओलांडण्याची गरज नाही. इसीससारखी संघटना बाहेर बसून बंगळूरमधील एखाद्या अभियंत्याचे माथे भडकावू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे.’’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRPF inducts women commandos for anti naxal operations