राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदी राज्यसभेत बोलणार? ठरणार पहिलेच पंतप्रधान

टीम ई सकाळ
Saturday, 6 February 2021

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनावरून आता संसदेतसुद्धा गोंधळ सुरु आहे. अशा वातावरणात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. 

नवी दिल्ली - कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनावरून आता संसदेतसुद्धा गोंधळ सुरु आहे. अशा वातावरणात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. ज्या पद्धतीने विरोधकांचा गोंधळ सुरु आहे ते पाहता असं वाटतं की भारताच्या संसदेमध्ये ऐतिहासिक घटना बघायला मिळू शकते. असं म्हटलं जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत भाषण करतील. मोदी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास राज्यसभेत बोलणार आहेत. 

संसदेच्या इतिहासात पहिल्यांदा हे घडतंय असं नाही की लोकसभेच्या चर्चेत पंतप्रधान भाग घेणार नाहीत. याआधी दोनवेळा असं घडलं आहे. यामध्ये 1999 आणि 2009 मध्ये लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणात पंतप्रधानांनी भाग घेतलेला नाही. मात्र तेव्हाच्या पंतप्रधानांनी राज्यसभेतही भाषण केलं नव्हतं. 1999 ला अटल बिहारी वाजपेयी तर 2009 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते.

हे वाचा - राकेश टिकैत म्हणाले, PM मोदींनी त्यांचा नंबर द्यावा, आम्ही कॉल करु

1999 मध्ये तत्कालीन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं होतं. तर केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांनी राज्यसभेत भाषण केलं होतं. 2009 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि लोकसभेचे नेते प्रणव मुखर्जी यांनी उत्तर दिलं होतं. अशी चारच उदाहरणं आहेत जेव्हा पंतप्रधानांनी राज्यसभेत भाषण केलं नाही मात्र लोकसभेत उत्तर दिलं. 

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रस्तावाला अनुमोदन देणं अद्याप बाकी आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी लोकसभेत अभिभाषणाला उत्तर देणार होते मात्र तीन दिवसांचे कामकाज संपवण्यात आलं. आता पंतप्रधान सोमवारी सकाळी 10.30 वाजता राज्यसभेत बोलतील. जर ते राज्यसभेत बोलले तर भारताच्या संसदीय इतिहासात ही ऐतिहासिक घटना ठरेल. 

हे वाचा - भारतरत्नवर रतन टाटा म्हणाले, लोकांच्या भावना कौतुकास्पद पण...

राज्यसभेतही पंतप्रधान मोदी स्वत: भाषण करतील का याबाबत संभ्रम आहे. त्यांच्याऐवजी राज्यसभेत राजनाथ सिंह हे बोलू शकतात अशी चर्चा आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी असं म्हटलं आहे की, मोदी राज्यसभेत बोलायला उभा राहिले तर काही पक्षांकडून वॉकआऊट केलं जाण्याची शक्यता आहे. जर मोदी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काही बोलले नाहीत तर राज्यसभेत गोंधळ होण्याची आणि कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi may reply to debate president speech in rajya sabha