जवानांनी नदीत बुडणाऱ्या मुलीला वाचविले (Video)

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले.

श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन आयुष्यातही जवान इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात, हे अनेकदा पाहायला मिळते.

तंगमर्ग येथील वेगाने वाहणाऱ्या ओढ्यात पडलेली नगिना ही लहान मुलगी बुडायची वेळ आली होती; पण कॉन्स्टेबल एम. जी. नायडू आणि एन. उपेंद्र या जवानांनी पाण्यात उडी घेत या मुलीला सुखरूप बाहेर काढले. ही मुलगी बुडत असताना "सीआरपीएफ'च्या सहा जवानांची तुकडी तेथून जाते होती. ही घटना पाहताच नायडू व उपेंद्र यांनी मदतीसाठी धाव घेत नगिनाला बाहेर काढले. नगिनाला वाचविण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल या दोन्ही जवानांना सन्मानचिन्ह देण्याची घोषणा "सीआरपीएफ'चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CRPF personnel saved a girl from drowning in Baramulla