तेलंगणमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

तेलंगणच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा सध्या येथील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा प्रश्‍न बनला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तो पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते. 

हैदराबाद- तेलंगणच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, हा सध्या येथील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा प्रश्‍न बनला आहे. के. चंद्रशेखर राव यांनी 13 डिसेंबरला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. तो पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते. 

राव यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना महंमद मेहमूद अली यांना फक्त कॅबिनेट सदस्य म्हणून घेतले. अल माजी उपमुख्यमंत्री असून, त्यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. शपथ घेतल्यावर राव प्रथम मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, हा अंदाज चुकला आणि त्यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याकडे लक्ष दिले आहे. नव्या जिल्ह्यांची निर्मिती, नवे महसूल विभाग आदी आश्‍वासने त्यांनी दिली होती. विविध निवृत्तिवेतन योजनांसाठीचे वय 57 वर्षांवर आणण्याकडेही ते लक्ष देत आहेत. राव यांनी सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती बळकट करण्याकडेही लक्ष दिले असून, त्यांचा मुलगा के. टी. रामाराव याला पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केले आहे. 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे राव यांच्यापुढील आव्हान आहे. कारण पक्षाचे 88 आमदार असून, दोन अपक्षही टीआरएसमध्ये सामील झाले आहेत. म्हणजे ही संख्या 90 वर जाते. विधान परिषदेत पक्षाचे 30 आमदार आहेत. विधानसभाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य प्रतोद वगळता कायद्यानुसार मंत्रिमंडळात 17 सदस्य घेता येतील. साहजिकच इच्छुकांची संख्या जास्त आहे. पुढील आठवड्यात सात ते आठ मंत्री घेण्याचा राव यांचा विचार असल्याचे कळते. नंतरचा विस्तार बहुदा लोकसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्‍यता आहे. सध्या विधानसभाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्य प्रतोद या पदांवर नेमण्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जातो आहे. 
 

Web Title: Curiosity for expanding the Cabinet in Telangana