नोटांसाठी आणखी 4 महिने ताटकळत राहावे लागणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नोकरदार वर्गाच्या अडचणीत वाढ
पुढील आठवड्यात नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बॅंकांपुढील अडचणीत आणखीनच वाढ होईल, असेही फेडरेशनने म्हटले आहे. वेतन झाल्यामुळे अनेक खातेदार मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी बॅंकांपुढे गर्दी करणार आहेत; पण त्याचवेळी बॅंकांना आवश्‍यक चलन न मिळाल्यास गोंधळात जास्तच भर पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली :"नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनता सध्या बॅंकेच्या रांगेत आलेली असताना, त्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. पुढील चार ते पाच महिने देशात नोटांचा तुटवडा जाणवेल,'' असे भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

देशातील चारही चलननिर्मिती केंद्रांनी पूर्ण क्षमतेने नोटा तयार करण्याचे काम केले तरीही बॅंकांना आवश्‍यक तेवढे चलन नजीकच्या काळात उपलब्ध होणे अवघड आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर 10 नोव्हेंबरपासून जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि जुन्या नोटा बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी लोकांनी बॅंकांसमोर रांगा लावायला सुरवात केली होती.

भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पी. के. विश्वास म्हणाले, बॅंकांमधील नोटांचा तुटवडा आणखी काही काळ कायम राहणार आहे. सर्व चलननिर्मिती केंद्रांवर पूर्ण क्षमतेने नोटा छापण्याचे काम केले तरी आवश्‍यक चलन तयार होऊन ते वितरणासाठी बॅंकांमध्ये येण्यास चार ते पाच महिने लागू शकतात. त्यानंतरच परिस्थिती सुरळीत होऊ शकेल. नोटाबंदीच्या निर्णयानंतर काही खातेदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील काही बॅंकांच्या शाखांमध्ये तोडफोड केली. पुरेशी रोकड नसल्यामुळेच लोकांमध्ये संताप आहे, असे विश्‍वास यांनी सांगितले.

नोकरदार वर्गाच्या अडचणीत वाढ
पुढील आठवड्यात नोकरदार वर्गाचे वेतन जमा झाल्यावर बॅंकांपुढील अडचणीत आणखीनच वाढ होईल, असेही फेडरेशनने म्हटले आहे. वेतन झाल्यामुळे अनेक खातेदार मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी बॅंकांपुढे गर्दी करणार आहेत; पण त्याचवेळी बॅंकांना आवश्‍यक चलन न मिळाल्यास गोंधळात जास्तच भर पडू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: currency notes issue to remain for 4 months