चालू खात्यावरील तूट वाढणार 

पीटीआय
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई (पीटीआय) : चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 2.8 टक्‍क्‍यांवर चालू खात्यावरील तूट जाईल, असा अंदाज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

मुंबई (पीटीआय) : चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 2.8 टक्‍क्‍यांवर चालू खात्यावरील तूट जाईल, असा अंदाज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

'एसबीआय'च्या संशोधन अहवालात म्हटले आहे, की व्यापारातील असमोतलामुळे व्यापारी तूट वाढत आहे. मागील आर्थिक वर्षात व्यापारी तूट 160 अब्ज डॉलरवर होती. चालू आर्थिक वर्षात ती 188 अब्ज डॉलरवर पोचेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ होत असल्याने आयातीचा खर्च वाढत आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षात चालू खात्यावरील तूट जीडीपीच्या 2.8 टक्‍क्‍यांवर जाईल. जुलैमध्ये व्यापारी तूट 18 अब्ज डॉलरवर पोचली होती. याला आयातीचा वाढता खर्च आणि निर्यातीची मंदालवलेली वाढ कारणीभूत ठरली होती. 

जुलैमध्ये तेलाच्या आयातीत 57.4 टक्के वाढ होऊन ती 12.4 अब्ज डॉलरवर गेली. मागील वर्षी जुलैमध्ये तेलाची आयात 7.8 अब्ज डॉलर होती. तेलाचे वाढलेले भाव आणि वाढलेले प्रमाण या वाढीस कारणीभूत ठरले. तेलाचा भाव मागील वर्षाच्या पातळीवर कायम राहिला असता तर तेलाच्या आयातीचा खर्च चालू आर्थिक वर्षातील पहिल्यात तिमाहीत 31.7 टक्‍क्‍याने कमी झाला असता. याचबरोबर तेलाची आयात मागील वर्षीएवढी कायम राहिली असती तर आयातीचा खर्च 5.5 टक्के कमी झाला असता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

Web Title: Current account deficit will increase