Tauktae : मुंबईत सोमवारीही लसीकरण बंद!

समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी ७१ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
Tauktae : मुंबईत सोमवारीही लसीकरण बंद!

Cyclone Tauktae: महाराष्ट्रासह (Maharashtra) चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे (Tauktae Storm) संकट (Disaster) घोंघावत आहे. कोकणात (Konkan) रत्नागिरीमध्ये शनिवारी (ता.१५) सायंकाळपासून पावसाला (Rain) सुरुवात झाली होती. देवभूमी केरळलाही (Kerala) वादळी वाऱ्यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या वादळाचा तडाखा बसलेल्या अनेक ठिकाणी जनजीवन (Public Life) पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. या वादळाचा रोख हा गुजरात, दमण-दिव आणि दादरा- नगर हवेलीच्या दिशेने असला तरीसुद्धा कोकण आणि किनारी भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसतो आहे. वाचा या वादळासंबंधीच्या लाईव्ह अपडेट्स...

मुंबईत सोमवारीही लसीकरण बंद!

Tauktae वादळच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या वादळाचा तडाखा मुंबईला बसणार नाही असा अंदाज आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून गेले दोन दिवस बंद असलेलं लसीकरण तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारीही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. आयुक्त चहल यांनी ही बातमी दिली. आता थेट मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी लसीकरण मोहिम पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही चहल यांनी स्पष्ट केले.

----------------------------------------------------------------------

गोवा राज्यात तौक्ते वादळामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या वादळाच्या तडाख्यात ५०० झाडं उन्मळून पडली. सुमारे १०० मोठ्या घरांचे आणि १०० छोट्या घरांचे नुकसान झाले. रस्ते बंद झाले आहेत. वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला आहे.

- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

----------------------------------------------------------------------

तौत्के चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

तौत्के चक्रीवादळानं सध्या कर्नाटकच्या किनारी भागाला झोडपून काढलं असून इथल्या सहा जिल्ह्यांत यांपैकी ३ किनारी भागात आणि पश्चिम घाटातील मालनाड येथे ३ जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत मोठ्या पावसाचा फटका बसला. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला तर ७३ गावांना फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं रविवारी दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळचा १८ मे रोजी सकाळी गुजरातच्या किनाऱ्याला तडाखा बसणार आहे.

----------------------------------------------------------------------

तौक्ते चक्रीवादळ गोव्यातून रत्नागिरीत दाखल

तौक्ते चक्रीवादळानं गोव्याचा किनारी भाग पार करुन रत्नागिरीजवळच्या समुद्रात प्रवेश केला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष आहे. हे चक्रीवादळ मोठी अडचण निर्माण करु शकते. त्यामुळे लाईफगार्ड्सह बचाव पथकं मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आली आहेत. मोठी झाडं जी या चक्रीवादळामुळं उन्मळून पडण्याची शक्यता आहेत ती छाटण्यात आली आहेत. पोलिसही यावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

----------------------------------------------------------------------

केरळमधील अनेक घरांचे नुकसान

केरळच्या तिरुअनंतपुरम किनारपट्टी भागात असलेल्या वालियाथुरा गावात समुद्राच्या लाटांमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांच्या बाजूच्या भिंती पडल्या आहेत, तर काही घरे वाहून गेली आहेत.

----------------------------------------------------------------------

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुजरातमधील अहमदाबादकडे पाच पथके रवाना झाली आहे, अशी माहिती एनडीआरएफ (NDRF) ने दिली आहे.

----------------------------------------------------------------------

रत्नागिरी जिल्ह्यातील ६३२ नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. दुपारी २ नंतर रत्नागिरी आणि परिसरात वादळाचा प्रभाव वाढू लागल्याचे दिसून आले. मालवण परिसरात मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा वाहू लागला आहे. गुहागरमधील वेळणेश्वर, कर्नाटकातील मुरुडेश्वर मंदिर परिसरात समुद्राला उधाण आले होते. बहुतांश कोकण पट्ट्यातील चित्र एकसारखेच दिसत आहे. दुसरीकडे अमरावती शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

----------------------------------------------------------------------

  • पणजीत सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उखडली. गोव्यात जोराचा वारा वाहत आहे

  • कर्नाटकात चौघांचा मृत्यू

    तौक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत ४ जणांना जीव गमवावा लागला असून सहा जिल्ह्यांतील ७३ गावांना या वादळाचा फटका बसला आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

  • सिंधुदुर्गात 'तौक्ते'चं तांडव

    तौक्ते वादळाने सिंधुदुर्गात हाहाकार उडवला आहे. याचा परिणाम शनिवारी (ता.१५) मध्यरात्रीपासूनच दिसू लागला. किनारपट्टीसह सह्याद्रीच्या रांगांमध्ये झाडांची मोठी पडझड झाल्याने वीज, दूरध्वनी यंत्रणा ठप्प झाली आहे. अनेक भागातील रस्ते वाहतूक बंद पडली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत; चक्रीवादळाचा धोका नाही

    कोकण किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळाने आज पहाटेपासून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असली, तरी कोकण रेल्वेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. मुंबईहून मडगावपर्यंत धावणाऱ्या सर्व गाड्या नियोजित वेळेत धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

  • रत्नागिरीतील ३६५ जणांना सुरक्षित स्थळी हलवले

    तौक्ते चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तीव्रता वाढली असून रत्नागिरीत (Ratnagiri) पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या आहेत. राजापूर तालुक्यातील आंबोळगडसह ३६५ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले (365 people evacuated) आहे. प्रशासन सज्ज झाले असून किनारी भागांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात आले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • रत्नागिरीतील नागरिकांना घरी थांबण्याच्या सूचना

    १६ आणि १७ मे या दोन दिवशी रत्नागिरी (Ratngiri Distrcit) जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडक देणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगडसह पाच तालुक्यांना तडाखा बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे कच्ची घरे/ पत्र्याची घरे, गुरांचे गोठे यांची पडझड होऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० किमी असल्याने किनारपट्टी भागातील झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली आहे. हे चक्रीवादळ ताशी १० किमी वेगाने उत्तरेकडे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे.

  • सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढू लागली असून दुपारनंतर ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. कुणकेश्वर आणि देवगड किनारपट्टीला फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ताशी १२० ते १५० किमी वेगाने वारे वाहत आहेत.

  • असा प्रवास होणार

    ‘तौक्‍ते' कोकण किनारपट्टीला समांतर पुढे गुजरातकडे रवाना होईल. रविवारी सकाळी वेंगुर्ले किनाऱ्याजवळून याचा प्रवास सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान राजापूर, आंबोळगड, सागवे, साखरीनाटे या परिसरातून ते प्रवेश करेल. दुपारी १ वाजेपर्यंत पूर्णगडला, पुढे सायंकाळी ४ वाजता रत्नागिरी शहरापर्यंत येईल. सायंकाळी ६ नंतर ते मालगुंड, नेवरे, जयगड, रात्री ११ वाजता गुहागर किनाऱ्यावरून दापोलीकडे जाईल. सोमवारी (ता. १७) पहाटे ४ ते ५ या कालावधीत ते दापोली, मंडणगडच्या किनाऱ्यावरून पुढे रवाना होण्याचा अंदाज विंडी या वेबसाइटने वर्तविला आहे.

  • नेत्रावती एक्सप्रेसला ब्रेक

    कोकण रेल्वे ट्रॅकवर तीन ठिकाणी झाडे पडल्याने नेत्रावती एक्सप्रेस माजोरड्याजवळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे थिवी ते मडगाव रेल्वे वाहतूक खोळंबली होती. कालपासून गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून सोसाट्याचा वारा सुटला आहे. गोव्यात २७ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

  • केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

    तौक्ते चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, दमण आणि दीव तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकांची आढावा बैठक घेतली.

  • गोव्यात झाडे कोसळण्याच्या घटना

    गोव्यात तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांसह गावातील रस्त्यांवर मोठमोठे वृक्ष कोसळले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेकडो वीज खांब कोसळले असून ट्रान्स्फॉर्मरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाला आहे. घरांवर झाडे कोसळून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पणजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनावर झाड कोसळल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. टाळगाव येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे दर्शनी भागातील ग्लास जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. तसेच दूरसंचार यंत्रणाही कोलमडली आहे.

  • बेळगावात जनजीवन विस्कळीत

    कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे (APMC) सुरू करण्यात आलेल्या शहरातील दोन भाजी मार्केटची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी सामान चोरी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा

    कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल, तसेच किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला असून वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात २१ मे पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडेल; तसेच घाट माथ्यावर तुरळक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

  • खेड तालुक्याला तडाखा

    महाराष्ट्रातील काही भागातही चक्रीवादळाचे पडसाद उमटले आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने काही घरांवरील कौले आणि पत्रे उडाली, तर काही ठिकाणी भिंती पडल्या. भोरगिरी, भिवेगाव आणि परिसरात शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांची छपरे उडाली असून घराच्या भिंतीही पडल्या आहेत. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की परिसरात घबराट पसरली होती. भिवेगाव येथील नव्याने बांधलेल्या जिल्हा परिषद शाळेचे छप्पर पूर्णपणे उडून गेले, तर साठवलेला पेंढा, वैरण उडून गेली. येथील माजी सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनगरे यांनी सांगितले की, वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की होत्याचे नव्हते झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

  • तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून केरळच्या अनेक भागांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळाचं केंद्र गोवा किनारपट्टीपासून १०० किमी पेक्षा कमी अंतरावर आहे. त्यामुळे गोवा आणि सिंधुदुर्गला जोरदार वारे आणि लाटांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तौक्तेचं अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

  • तौक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीभागात सक्रिय झालं असून वातावरणातही बदल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. जोराचे वारे वाहू लागले असून आभाळही काळ्या ढगांनी व्यापलं आहे.

  • चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी ७१ मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सध्या या केंद्रांमध्ये ५४३ कुटुंबातील २०९४ लोकांना ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com