95 वर्षानंतर पहिल्यांदाच सीपीआयच्या सरचिटणीसपदी दलित व्यक्तीची नेमणूक

वृत्तसंस्था
रविवार, 21 जुलै 2019

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या सरचिटणीसपदी राज्यसभेचे खासदार डी. राजा यांची निवड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या गेल्या 95 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दलित व्यक्तीची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय)च्या सरचिटणीसपदी राज्यसभेचे खासदार डी. राजा यांची निवड करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पक्षांच्या गेल्या 95 वर्षांच्या इतिहासात प्रथमच दलित व्यक्तीची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे याआधीचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी प्रकृती ठीक नसल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पक्षाची सूत्रे डी. राजा यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे. डाव्या पक्षांच्या उच्च पदस्थांमध्ये नेहमी उच्चवर्णियांचा समावेश असतो, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच होते. पण, या निवडीने टीकाकारांना उत्तर मिळाले असल्याचे बोलले जात आहे.

1925 साली सीपीआयची स्थापना झाली. त्यानंतर 11 वर्षांनी डॉ. आंबेडकर यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. त्यांच्या लेबर पार्टीने इंडस्ट्रिअल डिस्प्युट कायद्याविरोधात 1938 साली सीपीआयबरोबर संपात सहभाग घेतला होता. मात्र, दोन्ही पक्षांतील संबंध चांगले राहिले नाहीत. 1952 साली उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या उमेदवारीला सीपीआयने उघड विरोध केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: D Raja takes over as CPI general secretary