Dadasaheb Falke : ब्रिटीशांच्या त्या पत्रानंतर अवघ्या दोन दिवसांत दादासाहेबांचं निधन, काय होतं कारण? Dadasaheb Falke death anniversary 2023 after getting the letter of british he died within two days | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dadasaheb Falke

Dadasaheb Falke : ब्रिटीशांच्या त्या पत्रानंतर अवघ्या दोन दिवसांत दादासाहेबांचं निधन, काय होतं कारण?

Dadasaheb Falke : धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेमासृष्टीचे जनक मानल्या जाते. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांचा पहिला लांबलचक चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागली होती. या चित्रपटासाठी जो संघर्ष त्यांनी केला त्यानंतर त्यांचं नाव भविष्यात सिनेजगतात सुवर्ण अक्षरांनी कोरण्यात येणार होतं याची कल्पनासुद्धा तेव्हा त्यांना नव्हती.

सिनेमाचा पाया भारतात रुजू करणाऱ्या दादासाहेब फाळकेंच्या नावाने आता सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरीसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा देण्यात येतो.

त्या पहिल्या चित्रपटाचा संघर्ष अजिबात साधा सोपा नव्हता

दादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी आपले दागिने गहाण ठेऊन चित्रपटासाठी पैसे जमा करण्यासाठी मदत केली. त्या काळी स्त्रिया अभिनयक्षेत्रात काम नव्हत्या करत, म्हणून 'राजा हरिच्छंद्र' चित्रपटावेळी पुरुष भूमिकेसाठी कलाकार मिळाले, पण तारामतीच्या भूमिकेसाठी कुणीच मिळेना.

त्यावेळी दादासाहेब मुंबईच्या देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीतही गेले. या कामासाठी किती पैसे मिळतील, असं तिथल्या स्त्रियांनी विचारलं. दादासाहेबांनी काही एक आकडा सांगितल्यावर "तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढे आम्ही एका रात्रीत कमावतो," असं त्यांनी दादासाहेबांना सांगितलं.

दादासाहेब हॉटेलात चहा पित असताना तिथे काम करणाऱ्या सडपातळ गोऱ्या मुलाकडे त्यांचं लक्ष गेलं. हा मुलगा मुलीचं काम करू शकतो, असं त्यांना वाटतं. त्या मुलाचं नाव साळुंखे होतं. अखेर साळुंखे यांनीच तारामतीचं पात्र साकारलं.

कधी सोन्याचे तर कधी हलाखीचे दिवसही त्यांनी पाहिले

दादासाहेबांनी तयार केलेलं 'कालिया-मर्दन', 'लंकादहन' यासारखे चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरले. यातून पैसे मिळत गेले.

दादासाहेब यांची नात उषा पाटणकर सांगतात, "दासाहेबांची पत्नी म्हणजेच माझी आजी सांगायची की, चित्रपट निर्मितीतून इतका पैसा मिळायचा की, बैलगाडीभरून पैशांच्या गड्ड्या घरी येत."

मूक चित्रपटांचं पर्व संपल्यानंतर दादासाहेबांच्या अडचणी वाढल्या. मधल्या काळात ते वाराणसीला रवाना झाले. तिथून परतले मात्र पूर्वीसारखं यश मिळू शकलं नाही.

ब्रिटीशांच्या त्या पत्रानंतर दोन दिवसांतच त्यांचं निधन झालं

दादासाहेब यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर बीबीसीशी संवाद साधताना सांगतात की, "त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि चित्रपट निर्मितीसाठी लायसन्स घेणं अनिवार्य होतं. लायसन्स मिळावं यासाठी 1944 मध्ये दादासाहेबांनी पत्र लिहिलं. दोन वर्षांनंतर 14 फेब्रुवारी 1946 रोजी दादासाहेबांना परवानगी नाकारणारं पत्र आलं." (Dadasaheb Falke)

"हा नकार दादासाहेबांच्या जिव्हारी लागला. पत्र मिळाल्यानंतर दोनच दिवसांत दादासाहेबांनी हे जग सोडलं!"

दादासाहेब गेले मात्र सिनेजगताचा आदर्श जगापुढे रोवून गेलेत. त्यांच्या पुढाकारानं भारतात चित्रपटसृष्टीचा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. भारतात कोट्यावधींची कमाई करणाऱ्या श्रीमंत क्षेत्रातील एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र आहे.