
दलित विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकानं पाण्याच्या मडक्याला हात लावल्यामुळं बेदम मारहाण केलीय.
जालोर : राजस्थानमधील (Rajasthan) जालोर जिल्ह्यात (Jalore District) एका दलित विद्यार्थ्याला (Dalit Student) शाळेतील शिक्षकानं (Teacher) पाण्याच्या मडक्याला हात लावल्यामुळं बेदम मारहाण केलीय. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Ahmedabad Civil Hospital) शनिवारी सकाळी 11 वाजता दलित विद्यार्थी इंद्र कुमारचा मृत्यू झालाय.
आता या प्रकरणी जालोर जिल्ह्यातील सायला पोलिस ठाण्यात (Sayla Police Station) नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध खुनाचा आणि एससीएसटी अंतर्गत गुन्हा (SC/ST Act) दाखल केला. सुराणा येथील रहिवासी पोलाराम मेघवाल यांचा मुलगा किशोर कुमार यानं गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा तपास अधिकारी हिंमत चरण यांच्याकडं सोपवण्यात आला असून तपास सुरू होताच आरोपी शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळं जालोरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरातील इंटरनेट सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ही घटना जालोर जिल्ह्यातील सुराणा गावातील (Surana village) आहे. इंद्र मेघवाल या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शाळेत पाणी पिण्यासाठी पाण्याच्या मडक्याला स्पर्श केला होता.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, शिक्षक छैल सिंह यानं एवढी मारहाण केली की मुलाच्या कानाची नस फुटली. त्यांची प्रकृती गंभीर झाली. मुलाला जास्त वेदना होत असताना बगोडा, भीनमाळ, डीसा, मेहसाणा, उदयपूर या खासगी रुग्णालयात उपचारासाठी अनेक फेऱ्या मारल्या. त्यानंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. मात्र, शनिवारी सकाळी ११ वाजता इंद्र कुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.