esakal | जामिया विद्यापीठातील कब्रस्तानात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी
sakal

बोलून बातमी शोधा

Danish Sidiqui

जामिया विद्यापीठात होणार दानिश सिद्दीकींचा दफनविधी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुलित्झर पुरस्कारप्राप्त फोटोजर्नालिस्ट दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दहशतवादी आणि सैन्यातील संघर्षाचं कव्हरेज करताना दहशतवाद्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, दानिश सिद्दीकी दिल्लीतील ज्या जामिया मिलिया विद्यापाठातून शिकले त्याच विद्यापीठाच्या कब्रस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडणार आहे.

दानिश सिद्दीकी हे न्यूज एजन्सी रॉयटर्ससाठी काम करत होते. सिद्दीकी यांचं पार्थिव शरीर काबूल येथून एअर इंडियाच्या विमानानं रविवारी संध्याकाळी भारतात दाखल होणार आहे. दरम्यान, जामिया विद्यापीठातील कब्रस्तान जामियातील कर्मचारी, त्यांच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलांचे मृतदेह दफन करण्यासाठी आरक्षित आहे. मात्र, दानिश यांच्या कुटुंबियांनी त्यांचं पार्थिव जामिया विद्यापीठातील कब्रस्तानमध्येचं दफन करण्याची विनंती कुलगुरुंकडे केली होती. या विनंतीला मान देऊन प्रोटोकॉलबाहेर जात परवानगी दिली आहे.

दानिश सिद्दीकी हे जामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. तसेच त्यांचे वडील मोहम्मद अख्तर सिद्दीकी जामिया विद्यापीठात माजी प्राध्यापक होते, ते जामिया नगरमध्ये राहत होते. दानिश यांनी जामियातूनच आपलं शालेय, अर्थशास्त्रात पदवी आणि नंतर मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं. जामियाच्या कुलगुरु नझमा अख्तर यांनी शनिवारी दानिशच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वनं केलं.

loading image