'जीजेएम'च्या आंदोलना हिंसक वळण

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

दार्जिलिंगमधील हिंसाचार एक पुर्वनियोजित षडयंत्र असून, त्याची पाळेमुळे इशान्येकडील दहशतवादाशी जोडली गेलेली आहेत. नागरिकांनी येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करावे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री प.बंगाल

लष्कर तैनात; पोलिसांवर फेकले पेट्रोल बॉंब

दार्जिलिंग: वेगळ्या गोरखालॅंडच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागत पोलिस व आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली. आंदोलकांनी पोलिसांवर पेट्रोलबॉंब व दगडफेक केल्याचे प्रकारही घडले असून, सिंगमारी भागात लष्कर तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिंगमारी भागात आंदोलन करणाऱ्या जीजेएमच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यानंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक करत काही पेट्रोलबॉंबही फेकले. नंतर त्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. या धुमश्‍चक्रीत काही समर्थकांसह पोलिस दलाचे कर्मचारी जखमी झाले असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी येथे लष्कर तैनात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जेजीएमकडून आज एक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी ही रॅली रोखत आंदोलकांना माघार घेण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांच्या पाच वाहनांना आग लावली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना हुसकावून लावले. या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदचा आज तिसरा दिवस असून, येथील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

दोन समर्थकांचा मृत्यू
पोलिसांच्या गोळीबारात दोन समर्थकांचा मृत्यू झाल्याचा दावा जीजेएमचे नेते विनय तमांग यांनी केला आहे. मात्र, अतिरीक्त पोलिस महासंचालक अनुज शर्मा यांनी तो फेटाळून लावत पोलिसांनी कोणताही गोळीबार केला नसल्याचे स्पष्ट केले. उलट जीजेएमच्या समर्थकांनीच गोळीबार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, जमावातील एकाने खुकरी फेकून मारल्याने भारतीय राखीव बटालियनचे (आयआरबी) सहाय्यक कमांडंट किरण तमांग गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: darjeeling news gjm and gorkhaland