मोठी बातमी! रशियाची कोविड-19 लस मिळणार भारतीयांना

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 17 October 2020

जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत

नवी दिल्ली- जगभरातील अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. रशियाने कोरोनावरील पहिली लस तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतीन यांनी स्वत: याची घोषणा केली होती. रशियाची 'स्पुतनिक 5' लस आपल्याला मिळणार का, असा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. यासंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाच्या कोरोना लशीची चाचणी भारतात लवकरच सुरु केली जाणार आहे.

भारताच्या औषध नियामक मंडळाने डॉ. रेड्डी प्रयोगशाळेला रशियाच्या कोरोना लशीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ''स्पुतनिक 5'' लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतात पार पडणार आहेत. हैदराबादमध्ये स्थित असलेल्या डॉ. रेड्डी प्रयोगशाळेने रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडसोबत Russian Direct Investment Fund (RDIF) मागील महिन्यात करार केला होता. त्यानंतर डीसीजीआयने मंजूरी दिल्याने दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार आहे. 

बालकांच्या हत्याकांडाचा खटला जलद गती न्यायालयात : गृहमंत्री देशमुख

रशियाने स्पुटनिक लस आपल्या नागरिकांना देणे सुरु केले आहे. त्यानंतर आता भारतातही या लशीची चाचणी सुरु होणार असल्याने या वर्षीच्या शेवटपर्यंत कोरोना लस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये किती स्वयंसेवकांना लस दिली जाईल, तसेच कोठे-कोठे या लशीचे परिक्षण घेतले जाईल याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. 

स्पुतनिक लशीची चाचणी भारतात पार पडल्यास आणि लशीमधून चांगले परिणाम दिसून आल्यास रशिया भारताला 10 कोटी डोस पुरवणार आहे. स्पुतनिक लशीची रशियामध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे. यात 40,000 स्वयंसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय यूएईमध्येही या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेतली जात आहे.

राजकुमार रावच्या ‘छलांग’ची चर्चा; ट्रेलर झाला व्हायरल   

हे मोठे पाऊल असून कोरोना विरोधात लढण्यासाठी भारतात एक सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं रेड्डी प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक जी वी प्रसाद म्हणाले आहेत. दुसरीकडे, रशियानेही यावर प्रतिक्रिया दिली असून, भारतातील चाचण्यांमुळे लशीच्या वैद्यकीय विकासाला अधिक मजबुती मिळेल, असं रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडचे सीईओ किरिल दिमित्रिव म्हणाले आहेत. दरम्यान, रशियाच्या स्पुतनिक लशीला 11 ऑगस्ट रोजी रशियन आरोग्य मंत्रालयाची मंजूरी मिळाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DCGI approval to conduct phase 2 trials of Sputnik V vaccine in India