अयोध्येत २८ वर्षांनी ६ डिसेंबर शांततेत

Ayodhya
Ayodhya

भूतकाळ विसरून हिंदू-मुस्लिमांची पुढील दिशेने वाटचाल 
अयोध्या - बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर सहा डिसेंबर हा दिवस अयोध्येसाठी २८ वर्षांच्या खंडानंतर शांततेत गेला. राममंदिराचे भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाले असल्यामुळे आणि दुसरीकडे मशिदीसाठी वेगळी जागा देण्यात आल्यामुळे दोन्ही धर्मांच्या बांधवांनी पुढे पाऊल टाकत वाटचाल करायचे ठरविले.

१९९२ नंतर हिंदू हा दिवस शौर्य दिन, तर मुस्लीम काळा दिन म्हणून साजरा करायचे. अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राममंदीराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला. यंदा ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमीपूजन झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्यातील पहिले फिर्यादी हशीम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल यांनी सांगितले की, या दिवशी शोक व्यक्त करण्यासाठी काळे झेंडे लावण्याचे आपण थांबवावे असा सल्ला मी आमच्या समुदायाच्या लोकांना दिला. आता या भूमीतील सर्वोच्च न्यायालयाने जमिनीचा निकाल मंदीराच्याबाजूने दिला आहे.

काही अंतरावर नवी मशीद बांधण्यात येणार असल्यामुळे मुस्लिमांसाठी ही बाब आनंदाची आहे अशी इक्बाल यांची भावना आहे. धन्नीपूर परिसरात मशिदीसाठी पाच एकर जागा देण्यात आली असून पूर्वी बाबरी मशीद जेथे होती त्या ठिकाणापासून हे अंतर सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनने मशीद, रुग्णालय, संशोधन केंद्र आणि अन्नछत्र बांधण्याची जबाबदारी जामिया मिलीया इस्लामियाचे प्राध्यापक एस. एम. अख्तर यांच्यावर सोपवली. अख्तर हे वास्तुकलाशास्त्र विभागाचे प्रमुख असून आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले.

विहिंपचेही आवाहन
दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेसह अयोध्येतील हिंदू धर्मगुरुंनी यापुढे शौर्य दिवस पाळू नये असे आवाहन स्थानिक हिंदूंना केले. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, महंत कमलनारायण दास यांनी तसे निवेदन जारी केले. विहींपचे स्थानिक प्रमुख शरद शर्मा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने निकाल दिला असल्यामुळे आता शौर्य दिन पाळण्याचे कोणतेही औचित्य उरत नाही. मुख्य म्हणजे भूमीपूजन होऊन मंदिराचे बांधकामही सुरू झाले आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांनी पुढे वाटचाल करण्याची ही वेळ आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच...
शरयू किनारी येणारे भाविक तसेच अयोध्येतील पुजारी, दुकानदार, केशकर्तनकार अशी विविध वर्गातील बहुतांश मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय देतात. मोदीजी नसले असते तर रामाचा जन्म झालेल्या ठिकाणी मंदिराची निर्मिती सुरू होण्याचा दिवस उजाडला नसता अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकायला मिळते.

देशभरातील मुस्लिमांना संदेश
काळा दिवस पाळण्यासाठी पुढाकार घेणारे बुजुर्ग हाजी मेहबूब यांनी सांगितले की, यंदा शोक दिन पाळण्यात आला नाही. मुस्लिमांनी आपली दुकाने आज उघडी ठेवली. सहा डिसेंबर १९९२ रोजी मारल्या गेलेल्यांच्या स्मरणार्थ तेहरी बाजार मशिदीत कुराणचे पठण करण्यात आले. आम्ही भूतकाळ मागे ठेवून पुढे वाटचाल करायचे ठरवले आहे आणि सरस भविष्यासाठी उर्वरित देशातील मुस्लीम समुदायाला हा संदेश कळवला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com