esakal | अकरा जिल्ह्यांतील रुग्णसंख्येत घट; आरोग्य मंत्रालयाची माहिती

बोलून बातमी शोधा

Corona Patients
अकरा जिल्ह्यांतील रुग्णसंख्येत घट; आरोग्य मंत्रालयाची माहिती
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा भीषण तडाखा बसल्यापासून प्रत्येक दिवशी देशात सर्वाधिक रुग्णसंख्या (Patient) आढळणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रासह (Maharashtra) राजधानी दिल्लीतही (Delhi) कोरोनाच्या लाटेतून किंचित दिलासा मिळू लागल्याचे केंद्र सरकारने (Central Government) आज सांगितले.

महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांमध्ये संक्रमण दरामध्ये सातत्याने घट होत चालल्याचे निरीक्षण आहे, असे सांगतानाच, ‘नागरिकांनी आरोग्य नियमांची काटेकोर काळजी घेणे यापुढेही तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा आम्ही ही संधी घालवून बसू,’ असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

मध्य प्रदेशातही नव्या संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. मात्र बिहार, हरियाना, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये आता कोरोना नव्याने डोके वर काढू लागला आहे, याबद्दल केंद्राने चिंता व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, ‘देशातील १३ राज्यांमध्ये रुग्णांचे आणि संक्रमणाचे प्रमाण अल्पांशाने का होईना पण दिवसेंदिवस घटत चालले आहे.’

काल संपलेल्या विधानसभा निवडणुकीत लाखालाखांच्या सभा घेण्यात देशाचे सर्वोच्च नेते जेथे मग्न होते, त्या पश्चिम बंगालसह अनेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये मात्र वाढती रुग्णसंख्या बघायला मिळते असे केंद्रीय आकडेवारी सांगते. कोरोना विस्फोट होणाऱ्यांमध्ये निवडणुका झालेली पाचही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत.

हेही वाचा: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

‘रिकव्हरी’ दरही सुधारला

कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच ‘रिकव्हरी’ दरही सुधारला असल्याचे सांगून अगरवाल म्हणाले, ‘दोन मे रोजी ७८ टक्के इतका रिकव्हरी दर होता तो आज किंचित वाढून ८२ टक्के इतका झाला. मात्र वर्तमान लढाईमध्ये ही यश येण्याची प्रारंभिक लक्षणे आहेत. अखंड सावधानता आणि आरोग्य नियमांचे प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे.’’

रुग्णसंख्या वाढत चाललेली ही राज्ये - पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, गोवा, चंडीगड, हरियाना, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, त्रिपुरा.

‘सिटीस्कॅन’चा अट्टहास नको

कोरोनाची हलकी लक्षणे असलेल्या रुग्णांनी काम करण्याचा अट्टहास टाळावा. अन्यथा तो हानिकारक ठरू शकतो, असा इशारा ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज दिला. अनेकदा डॉक्टरांकडून ‘सिटीस्कॅन’ आणि ‘बायोमार्कर’चा गैरवापर केला जातो, असाही इशारा त्यांनी दिला. चाचणी निगेटिव्ह आल्यावरही डॉक्टर सिटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला रुग्णांना देतात. मात्र तो हानिकारक आहे, असे सांगून डॉ गुलेरिया म्हणाले की विनाकारण सिटीस्कॅन केले तर, त्यामुळे कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. एक ‘सिटीस्कॅन’ हा ३०० वेळा छातीचा एक्स-रे काढण्यासारखा असतो. जर हलकी लक्षणे असतील तर ‘सिटीस्कॅन’ करून काहीही फायदा होत नाही.

कोरोनाविरोधात हेही मैदानात

  • वैद्यकीय शाखेचे प्रशिक्षणार्थी,

  • एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी

  • बीएससी, जीएनएम पदवीधर

केंद्राचे अन्य निर्णय

  • शंभर दिवसांची कोविड ड्युटी पूर्ण करणाऱ्यांना विशेष कोविड सन्मान

  • नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलली

रुग्णसंख्या घटत असलेली राज्ये

दिल्ली, गुजरात, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगण, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण- दीव आणि छत्तीसगड.

रुग्णसंख्या घटलेले राज्यातील जिल्हे

मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, भंडारा, गोंदिया, जळगाव, लातूर, नांदेड, नंदुरबार व वाशीम.