esakal | एकात्मिक लढाऊ गट नेमण्याचा संरक्षण तज्ञांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

ARMY

एकात्मिक लढाऊ गट नेमण्याचा संरक्षण तज्ञांचा सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अफगाणिस्तानची सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानला पाकिस्तान आणि चीनचा पाठिंबा आहे. चीनचा महत्त्वकांशी ‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्प, पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी हालचाली आदींच्या पार्श्‍वभूमिवर या सीमावर्ती भागात ‘एकात्मिक लढाऊ गट म्हणजेच इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स’ (आयबीजी) त्वरित नेमायला हवीत असा सल्ला संरक्षण तज्ञांनी दिला आहे.

देशाच्या पश्‍चिमी सीमाभागात पाकिस्तान तर उत्तरेकडील भागात चीन या देशांमुळे भारताला अधिक दक्षतेने राहणे गरजेचे आहे. याबद्दल बोलताना मेजर जनरल (निवृत्त) राजन कोचर म्हणाले, ‘‘तालिबानमधील सत्ता बदलाने भारता समोरील संरक्षण आव्हानेही वाढले आहेत. उत्तर पश्‍चिम सीमावर्ती भागात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याबरोबर संभाव्य हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सैन्य दलांमध्ये समन्वय आवश्‍यक आहे. आधुनिक युद्धनितीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेपासून मानवविरहित ड्रोन हल्ल्यांपर्यंत सर्वच आयुधांचा वापर करण्यात येतो. त्या अनुषंगाने आयबीजी हे पूर्णपणे त्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तयार असते.’’

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

दरम्यान संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सीमावर्तीभागात एकात्मिक लढाऊ गटाला (आयबीजी) तैनात करण्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. आयबीजी हे शत्रूंविरोधात जलद आणि एकत्रित लढण्यासाठीचे नवीन गट असतील. असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच वेलिंग्टन डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला संबोधित करताना म्हटले होते.

आयबीजी म्हणजे काय ?

सीमाभागातील घडामोडींना पाहता अशा ठिकाणी चपळता व स्वयंपूर्ण लढाईच्या दृष्टीने तयार असलेला लष्कराचा गट म्हणजेच एकात्मिक लढाऊ गट (आयबीजी). कोणत्याही परिस्थितीमध्ये आयबीजी हे शत्रूच्या विरोधात त्वरित हल्ला करण्यासाठी सक्षम असतील. या गटाला धोक्याची परिस्थिती, भूभाग आणि विविध आव्हानांसाठी तयार करण्यात येईल.

हेही वाचा: सर्व जनतेने घेतला पहिला डोस; 'या' राज्यांनी मिळवला पहिला मान

आयबीजीचे वैशिष्ट्य

- प्रत्येक आयबीजीची सैन्य संख्या सुमारे पाच हजार इतकी असेल

- ‘आयएसआर’ (शत्रूंच्या हालचालींची माहिती, बुद्धीमत्ता व पाळत ठेवणे) प्रणालीच्या आधारावर काम करणे

- यामध्ये पायदळ, आर्टिलरी, आर्मर्ड, इंजिनिअर्स, सिग्नल, एअर डिफेन्स सारख्या सेवा पुरविणार

- सीमेवर मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्याच्या अनुषंगाने आयबीजीचा पर्याय उपयुक्त

‘‘देशाचा सीमाभाग हा १५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या भागात सतत पाळत ठेवणे आव्हानात्मक आहे, त्याचबरोबर अचानक होणारे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. सध्या पश्‍चिमी भागात सुरक्षेच्या अनुषंगाने अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये वेळेत या हल्ल्यांचे प्रतिउत्तर देणे त्याचबरोबर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एकात्मिक लढाऊ गट महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. तर देशाच्या उत्तर-पूर्व भागाला देखील अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या प्रतिकारशक्ती तयार केल्या जातील त्या पूर्वोत्तर भागासाठी देखील तयार करणे फायद्याचे राहील.’’

- कमोडोर (निवृत्त) एस एल देशमुख

loading image
go to top