esakal | योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप
sakal

बोलून बातमी शोधा

योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपमधील वाद शमण्याची चिन्हे नाहीत. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राज्याची आर्थिक प्रगती दाखविण्यासाठी प्रकाशित केलेल्या जाहिरातीत कोलकत्यातील उड्डाणपुलाचा वापर केल्याचा दावा करत तृणमूलने त्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ही कोलकता उड्डाणपुलाची प्रतिमा असल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचा दावा भाजपने केला.

हेही वाचा: ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

‘योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशचा कायापालट’ या शीर्षकाची जाहिरात एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. त्यात कोलकत्यातील निळ्या व पांढऱ्या रंगाच्या उड्डाणपुलाशी साधर्म्य असलेली प्रतिमा वापरली आहे. त्याचप्रमाणे, योगी आदित्यनाथ यांच्या कट आऊटखाली उत्तर प्रदेशात उद्योगांचा झालेला विस्तारही दाखविला आहे. उत्तर प्रदेशला २०१७ पूर्वी गुंतवणुकीबाबत कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. मात्र, योगी आदित्यनाथ सरकारच्या साडेचार वर्षांच्या काळात राज्याची ही नकारात्मक छबी बदलली आणि उत्तर प्रदेश देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला, असा संदेशही या जाहिरातीत दिला आहे.

हेही वाचा: भाजपने वर्षभरात पाच मुख्यमंत्री बदलले; झारखंड निवडणुकीतून घेतला धडा?

जाहिरातीत एक शुद्धिपत्रकही जोडले आहे. त्यात वृत्तपत्राच्या विपणन विभागाने तयार केलेल्या उत्तर प्रदेशवरील जाहिरातीत चुकीची प्रतिमा वापरण्यात आली आहे, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सर्व डिजिटल आवृत्तींतून उड्डाणपुलाची प्रतिमा काढण्यात आल्याचेही नमूद केले आहे. मात्र, तृणमूलने यावरून भाजपवर निशाणा साधण्याची संधी गमावली नाही. या उड्डाणपुलाचा वापर करून भाजपने ममता बॅनर्जी सरकारच्या विकासकामांचा अप्रत्यक्ष स्वीकार केला आहे, असे तृणमलने म्हटले आहे. प.बंगालचे परिवहन मंत्री फिरहाद हकीम म्हणाले, की आमच्यासाठी अभिमान असलेल्या मा उड्डाणपुलाची प्रतिमा योगी सरकारने अशा प्रकारे वापरली आहे, जणू स्वत:च्या राज्यातच उड्डाणपूल बांधला आहे. यातून उत्तर प्रदेश सरकारने खोटेपणाची नवीन सीमा गाठली आहे.

दरम्यान, भाजपने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशात आदित्यनाथ सरकारने अनेक उड्डाणपूल बांधले तर गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमध्ये अनेक उड्डाणपूल कोसळत आहेत, असा टोला पक्षाने तृणमूलला लगावला. यावर आता तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, ही जाहिरात म्हणजे प.बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात उभारलेल्या पायाभूत सुविधांची प्रतिमा चोरण्याचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशसारख्या भाजपच्या सर्वांत मोठ्या राज्यात ‘डबल इंजिन मॉडेल’ साफ अपयशी ठरले आहे. त्यामुळे, प.बंगालच्या उड्डाणपुलाच्या प्रतिमोचा वापर केला आहे.

loading image
go to top