कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार; चीन मुद्द्यावरुन राजनाथ सिंहांचं संसदेत प्रतिपादन

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 15 September 2020

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत चीनच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

नवी दिल्ली- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत चीनच्या मुद्द्यावर भाष्य केलं. गेल्या जवळजवळ ४ महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. उभय देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिक तयार केले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंह यांनी संसदेत बोलताना भारत-चीन मुद्दा जटील असल्याचं म्हटलं आहे. तसेच हा मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवावा लागेल, असं ते म्हणाले. 

भारत आणि चीनमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे, पण चीन वारंवार द्विपक्षीय कराराचं उल्लंघन करत आहे. चीनच्या सैनिकांनी अनेकदा जैसे थै स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शांतता हवी आहे. उभय देशांमध्ये संबंध टिकवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. पण कराराचा सन्मान करणे आवश्यक आहे, असं सिंह म्हणाले. 

रशियानंतर आता चीनची लस तयार? वाचा सर्वसामान्यांना कधी मिळणार

१५ जून रोजी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांशी संघर्ष केला. भारतीय सैनिकांनी त्यांचा जोरदार प्रत्युत्तर दिलं. देशाला जवानांच्या शौर्याचा अभिमान आहे. चीनने सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांनी तैनाती केली आहे. शिवाय या परिसरात चीनने बांधकाम कार्य हाती घेतले आहे. गलवान संघर्षानंतरही चीनच्या पीएलएने जैसे थे परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारताची तयारी पूर्ण आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची आमची तयारी आहे, असंही सिंह संसदीय भाषणात म्हणाले आहेत. 

चीन मुद्द्यावर बोलण्यावर विरोधीपक्ष केंद्र सरकारवर दबाव आणत होते. राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीन मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं.चीन सध्याची सीमा मानण्यास तयार नाही, त्यामुळे चीनसोबतचा वाद अजून सुटलेला नाही. सीमेबाबत दोघांचाही दृष्टीकोन वेगळा असल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संघर्ष होत असल्याचं ते म्हणाले आहेत. १९६० साली ठरलेल्या सीमेचे आम्ही पालन करत आहोत, पण चीन आता ही सीमा मानण्यास तयार नाही, असंही सिंह म्हणाले.

सैन्यांसाठी शस्त्रास्त्रांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याना अनेक चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. लडाखमध्ये आपण एका कठीण प्रसंगाशी सामना करत आहोत. मी भारतीय जवानांना विश्वास देऊ इच्छितो की, पूर्ण संसद त्यांच्या पाठिशी खंभीरपणे उभी आहे. सीमेवरील परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. जेव्हा देशासमोर अडचणी आल्या आहेत, तेव्हा संसद आपल्या सैनिकांसोबत राहिली आहे. आमच्या सैनिकांचा उत्साह आणि हिंमत अद्वितीय आहे, असं ते म्हणाले आहेत. 

सरकार म्हणतंय, 'प्रवासी मजुरांच्या मृत्यूची आकडेवारी नाही, त्यामुळे नुकसान...

कोविडच्या परिस्थितीत देखील सैन्य दल आणि ITBP ची सीमेवर तात्काळ तैनाती करण्यात आली. सरकारने सीमेच्या विकासाला प्राथमिकता दिली आहे. आमच्या सरकारने सीमाभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात बजेट वाढवला आहे. सीमा भागात अनेक रोड आणि ब्रिज बांधण्यात आले आहेत. त्यामुळे सैन्याला चांगला सपोर्ट मिळाला असल्याचे सिंह संसदेत म्हणाले. 

दरम्यान, १५ जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झडप झाली होती. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनचीही हानी झाली होती, मात्र याबाबतची माहिती देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून उभय देशांमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठा फौजफाटा तैनात केलाय. चीनने या काळात दोनदा 'जैसे थे' परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. यात भारताने दक्षिण पेंगॉंग तलावाच्या परिसरात ताबा मिळवला असल्याने, चीनचा तिळपापड झाला आहे.  दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर चर्चा सुरु आहे. पण, याला यश येताना दिसत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: defense minister rajnath singhin parliament speak