
दिल्लीत एक कोटी रुपये किंमतीचे हिरे लुटल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी एका कारच्या जवळ येत हिरे लुटले होते.
नवी दिल्ली - दिल्लीत एक कोटी रुपये किंमतीचे हिरे लुटल्याची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी एका कारच्या जवळ येत हिरे लुटले होते. दोन्ही दरोडेखोरांनी मास्कही घातले होते. मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
दिल्लीतील रवी कपूर हे बुधवारी पत्नीसोबत दागिन्यांच्या दुकानात गेले होते. दुकानातून बाहेर आल्यानंतर ते कारजवळ येत होते. तेव्हा रानी झासी रोड इथं दुचाकीवर असलेल्या दोघांनी त्यांना कार थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर काही अंतर पुढे जाऊन कारचा रस्ता अडवला. तसंच कार थांबण्यास सांगितल्यानंतर कपूर गाडीतून बाहेर उतरून त्यांच्याशी बोलण्यासाठी निघाले होते. दोघांशी बोलून पुन्हा कारमध्ये बसायला आले तर गाडीतील कोट्यवधींच्या हिऱ्यांची चोरी झाली होती.
रवी कपूर यांनी हिऱ्यांची लहान बॅग पत्नी ज्या सीटवर बसली होती तिथंच बाजुला ठेवली होती. त्यामध्ये कोट्यवधींचे हिरे आणि दहा लाख रुपयांची रोकड होती. कपूर गाडीतून उतरून बाहेर गेल्यानंतर गडबडीतच दोघांपैकी एकाने कारमधील बॅग लंपास केली. कपूर दाम्पत्याने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही दुचाकीवरून निघून गेले होते. जाता जाता त्यांनी मागे वळून कपूर दाम्पत्याला फ्लाइंग किससुद्धा दिला.
हे वाचा - घरी चिमुकल्या पावलांची चाहूल आणि वडिलांनी विमान अपघातात सोडले प्राण
घटना घडताच रवी कपूर यांनी पोलिसांत धाव घेतली. तक्रार दिल्यानंतर आणि ज्या प्रकारे चोरी करण्यात आली त्यावरून पोलिसांनी हा कारनामा ठकठक गँगने केल्याचं ओळखलं. ठकठक गँगमधील लोक ड्रायव्हरला बोलण्यात गुंतवतात किंवा त्याला गाडीच्या बाहेर पडण्यासाठी भाग पाडतात. त्यानंतर गाडीतील महागड्या वस्तूंवर डल्ला मारतात. ही टोळी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सक्रीय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठकठक गँगच्या टोळीतील चोर सापडले तरी त्यांच्याकडून चोरीचा माल सापडणं अवघड असतं. चोरीनंतर ते लगेच चोरीच्या मालाची व्यवस्था लावतात. त्यामुळे अनेकदा चोरीतील मुद्देमाल संपूर्ण परत मिळण्याची शक्यता कमी असते. हिऱ्यांच्या लूटीप्रकरणाचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.