गाढ झोपेतच काळाचा घाला!

पीटीआय
सोमवार, 9 डिसेंबर 2019

इमारतीला नव्हता अग्निसुरक्षेचा परवाना
अनाज मंडीत रविवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चार मजली इमारतीला अग्निसुरक्षेसाठीचा परवाना नव्हता, अशी माहिती दिल्ली अग्निशामक दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली. संबंधित इमारतीमध्ये अग्निरोधक उपकरणेही बसविण्यात आलेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच आग लागताच ती विझविण्याची यंत्रणा नसल्याने ती पसरली. दिल्ली सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी त्यांच्यावर टीकाही होत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील अनाज मंडीत पहाटेच्या वेळी झालेल्या अग्नितांडवाने देशाची राजधानी हादरून गेली. दिवसभर काम करून थकलेले कारखान्यातील कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. झोपेतच असताना आग लागल्याने या कामगारांना स्वत:चा बचावही करता आला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

मारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग वेगाने भडकली. काय झाले हे समजण्यापूर्वीच झोपेत असलेल्या कामगारांना आगीने वेढले. अग्निशामक दलाच्या सुमारे १५० जवानांनी आग लागलेल्या चार मजली इमारतींमधून ६३ जणांना बाहेर काढले. ४३ कामगारांवर मृत्यूने झडप घातली, तर अनेक जण जखमी झाले असल्याचे अग्निशामक दल आणि पोलिसांकडून सांगण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये अग्निशामक दलाच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आगीत होरपळून आणि गुदमरल्यामुळे हे मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार पहाटेच्या वेळी गाढ झोपेत असताना ही दुर्घटना घडल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

बघ्यांची गर्दी
घटनास्थळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू होते, त्या वेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. घटनास्थळाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यांमुळेही अडथळे येत होते. अतिशय चिंचोळ्या गल्लीत ही इमारत असल्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

#Delhifire:दिल्लीतील आगीच्या घटनेचं कारण काय?   

शॉर्टसर्किटमुळे लागली आग?
झाशीची राणी रस्त्यावर अतिगर्दीच्या भागात असलेल्या या इमारतीमध्ये बॅग तयार करण्याचा कारखाना अनधिकृतपणे सुरू होता. या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

फायरमन राजेश शुक्‍लांमुळे ११ जणांना जीवदान 
आग लागल्याची वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांमध्ये राजेश शुक्‍ला यांचा समावेश होता. शुक्‍ला यांनी धाडस दाखवत आग लागलेल्या इमारतीत अडकलेल्या ११ जणांची सुटका केली. या मदतकार्यावेळी शुक्‍ला हे जखमी झाले असून, त्यांच्या पायाला इजा झाली आहे. त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी रुग्णालयात जाऊन शुक्‍ला यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शुक्‍ला यांच्या धाडसी कामगिरीचेही या वेळी जैन यांनी कौतुक केले. जैन यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘फायरमन राजेश शुक्‍ला हे खरे ‘हीरो’ आहेत. आग लागलेल्या ठिकाणी थेट प्रवेश करून त्यांनी ११ जणांची मुक्तता केली. स्वतः जखमी होऊनही शुक्‍ला यांनी आपले कर्तव्य पार पाडले. शुक्‍ला यांच्या असामान्य कामगिरीला सलाम!’’  शुक्ला यांच्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियातूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi anaj mandi fire