Unnao Rape Case : पोलिसांच्या मध्यस्तीनंतर कडेकोट बंदोबस्तात पीडितेवर अंत्यसंस्कार!

वृत्तसंस्था
Sunday, 8 December 2019

या घटनेनंतर संतापलेल्या पीडितेच्या बहिणीने दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अन्यथा आपण मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे.

उन्नाव (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बलात्कारपीडितेवर रविवारी (ता.8) तिच्या मूळगावी कडेकोट बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी स्थानिक नागरिक आणि पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

पीडितेच्या पार्थिवावर दफन पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयामध्ये शुक्रवारी (ता.6) रात्री या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर देशभर जनक्षोभ उसळला होता. शनिवारी (ता.7) सायंकाळी पीडितेचा मृतदेह उन्नावमध्ये आणल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येईपर्यंत तिच्या मृचदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका तिच्या घरच्यांनी घेतली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत समजूत काढल्यानंतर पीडितेचे कुटुंबीय अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. 

- दिल्लीत अनाज मंडी परिसरात भीषण आग; 43 जणांचा मृत्यू

पीडितेच्या बहिणीचा आत्मदहनाचा इशारा 

दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या पीडितेच्या बहिणीने दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अन्यथा आपण मुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. संबंधित पीडिता ही सुनावणीसाठी रायबरेली येथील न्यायालयामध्ये जात असताना याच बलात्कार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपींनी तिच्यावर हल्ला करत तिला पेटवून दिले होते.

- बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार; पीडितेवर ऍसिड हल्ला

माझ्या बहिणीला आधीच जाळण्यात आले होते, यामुळेच तडफडून तिचा मृत्यू झाला होता. आता तिला पुन्हा जाळण्याएवढे धैर्य आमच्याकडे राहिलेले नाही. यामुळे आम्ही तिचे दफन केले. 
- पीडितेची बहीण 

आज अंत्यसंस्कारप्रसंगी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील स्वामी प्रसाद मौर्य आणि कमल राणी वरुण हे दोघे उपस्थित होते. तत्पूर्वी पीडितेच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमच्या गावी येऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन देत नाहीत, तोवर पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. पण, स्थानिक प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर ते अंत्यसंस्काराला तयार झाले. 

- अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं तासाभरात चोख प्रत्युत्तर

उन्नावमधील पीडितेच्या कुटुंबीयांना 24 तास संरक्षण देण्यात येईल. तिच्या भावाला आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात आला असून बहिणीला नोकरी आणि कुटुंबीयांसाठी दोन घरे देण्यात येईल, अशी माहिती लखनऊचे पोलीस आयुक्त मुकेश मेश्राम यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unnao rape victim who was burnt alive gets buried amid in tight security