भाजप नेते मनोज तिवारींच्या घरावर हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

तिवारी यांनी घरी येताच याबाबतची तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर तिवारी यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने आले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

नवी दिल्ली - भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघांना मारहाण करण्यात आली असून, या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील 159 नॉर्थ ऍव्हेन्यू या मनोज तिवारींच्या निवासस्थानावर रविवारी रात्री बाराच्या सुमारास 8 ते 12 जणांना दगडफेक केली. या वेळी तिवारी घरी उपस्थित नव्हते. त्यांचे स्वीय सहाय्यक अभिनव मिश्रा आणि स्वयंपाकी यांना मारहाण करण्यात आली. या दगडफेकीबद्दल तिवारी यांना माहिती देण्यात आल्यानंतर ते घरी पोहचले. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

तिवारी यांनी घरी येताच याबाबतची तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर तिवारी यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने आले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली महापालिका निवडणुकीत नुकतेच तिवारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे यश मिळाले होते.

Web Title: Delhi BJP Chief Manoj Tiwari's House Ransacked, Intruders Caught On CCTV