जावडेकर-केजरीवाल आमने-सामने, दिल्लीतील प्रदूषणावरून राजकीय धुळवड

Delhi Chief Minister, Arvind Kejriwal,Union Environment Minister,Prakash Javadekar, air pollution
Delhi Chief Minister, Arvind Kejriwal,Union Environment Minister,Prakash Javadekar, air pollution

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रदूषणाला शेजारच्या राज्यांत शेतातच जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्याचे प्रमाण नगण्य म्हणजे फक्त 4 टक्के असते अशी भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज घेतली. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, "(काडीकचऱ्याच्या कारणाचा) वारंवार इन्कार केल्याने काही होणार नाही' असा उलटवार केला. दिल्लीत हिवाळ्याआधीच जीवघेण्या प्रदूषणाची चाहूल लागली असली तरी दरवर्षी हिवाळ्यात नित्यनेमाने दिल्लीकरांचा श्‍वास कोंडणाऱ्या या प्रदूषणाचे नेमके कारण कोणते, यावरूनच जोरदार राजकीय जुगलबंदी सुरू झाली आहे.

जावडेकर यांनी काडीकचरा जाळण्याचे प्रकार रोखण्याबाबत पंजाब सरकारला कडक इशारा दिला. मात्र शेजारच्याच हरियाणातील याच बेशिस्तीबद्दल त्यांनी "ह' देखील उच्चारल्याचे वृत्त नाही. नासाच्या ताज्या उपग्रह छायाचित्रांनुसार पंजाबातील अमृतसर, फिरोजपूर व फरीदकोट तसेच भाजपशासित हरियाणातील पटियाला, अंबाला, राजपुरा या भागातील शेतात काडीकचरा प्रचंड प्रमाणात जाळला जात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रदूषण वाढल्याने अनेक नागरिकांना डोळे जळजळणे, श्‍वास घेताना अडथळे यासारखे विकार उद्भवल्याच्या तक्रारी आहेत. 

एखाद्या बशीच्या आकारात वसलेल्या दिल्लीचे रूपांतर दर हिवाळ्यात 'गॅस चेंबर' मध्ये करणाऱ्या प्रदूषणात शेजारच्या राज्यांतील शेतातच जाळण्यात येणाऱ्या काडीकचऱ्याचे प्रमाण मोठे असल्याचे केंद्र सरकारने एकदा नव्हे अनेकदा मान्य केले आहे. खुद्द जावडेकर यांनी यापूर्वी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून बोलताना, 'दिल्ली शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या धुरावर आधी नियंत्रण आणा' अशी भूमिका घेतली होती. आज सकाळी त्यांनी एनसीआरमधील प्रदूषण नियंत्रणासाठी नेमलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (सीपीसीबी) गटांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की दिल्लीच्या प्रदूषणाला काडीकचऱ्याचा धूर केवळ 4 टक्के जबाबदार असतो व 96 टक्के स्थानिक कारणांमुळे प्रदूषण वाढते. ते म्हणाले की हिवाळ्यात नेहमी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर बनतो. यामागे काडीकचरा जाळणे, हिमालयाकडून येणारे गार वारे, गंगेच्या मैदानी प्रदेशातील सर्द हवा, स्थिर झालेली हवा, स्थानिक पातळीवरील बांधकामांमुळे उडणारी धूळ, रस्त्यांवरील धूळ, वाहनांतून निघणारा धूर, लोकांकडून उघड्यावर कचरा जाळणे आदी अनेक कारणे आहेत. दिल्लीतील प्रदूषणात काडीकचरा जाळल्याने आलेल्या धुराचे प्रमाण फक्त 4 टक्के व स्थानिक कारणे 96 टक्के आहेत. 

जावडेकरांच्या या प्रतिक्रियेला केजरीवालांनी जोरदार प्रत्युत्तर देताना , वारंवार इन्कार करून काहीही होणार नाही. जर काडीकचर्यामुळे केवळ 4 टक्के प्रदूषण होत असेल तर कालच्या एका रात्रीत दिल्लीतील प्रदूषण इतके कसे वाढले? त्याआधी तर दिल्लीची हवा बऱ्याच अंशी स्वच्छ होती. दरवर्षी ही एकच कहाणी घडते. उत्तर भारतात शेतातच काडीकचरा जाळल्याने प्रदूषण वाढते व याच्याशी आम्हा सर्वांना मिळून लढावे लागेल. परस्परांवर आरोप केल्याने नुकसान फक्त नागरिकांच्या आरोग्याचे होईल. कोरोनाकाळात दिल्लीतील प्रदूषणाचे हे संकट चिंताजनक विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com