अरविंद केजरीवाल यांचे आंदोलन अखेर मागे

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन मागे घेतले. 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 9 दिवसांपासून दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलन सुरु केले होते. मात्र, आयएएस अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडा, असे पत्र दिल्यानंतर केजरीवाल यांनी अखेर 9 दिवसानंतर आंदोलन मागे घेतले. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण तापले होते. आयएएस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी अनेकदा मागणी करूनही राज्यपाल बैजल प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन 11 जूनपासून सुरु केले होते. तसेच या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया व गोपाल राय आणि सत्येंद्र राय यांनी राजनिवासाच्या आगांतूक कक्षात धरणेलाही बसले होते.  

दरम्यान, केजरीवालांच्या या आंदोलनाला कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पाठिंबा दिला होता. या चार मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे बैजल यांच्यावरील दबाव वाढला होता. अखेर त्यांनी केजरीवाल यांच्या आंदोलनाची दखल घेत चर्चेची तयारी दाखविली.

Web Title: Delhi CM Arvind Kejriwal leaves LGs office as protest ends