
दिल्लीत कोरोना स्थिती विकोपाला; लष्कराला पाचारण करा!
नवी दिल्ली- दिल्लीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर जवळपास महिना उलटला तरी आटोक्यात येत नसल्याने दिल्ली सरकारने आता कोरोना नियंत्रण आणि उपचारांसाठी भारतीय लष्कराची मदत मागितली आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तशी विनंती करणारे पत्र संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना लिहिले आहे. दिल्लीत कोरोनाचा प्रकोप विकोपाला गेला आहे. मिनी लॉकडाउन म्हणून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आजपासून सलग तिसऱ्यांदा वाढवणे अरविंद केजरीवाल सरकारला भाग पडले आहे. २ कोटी लोकसंख्येच्या दिल्लीत दररोज किमान २० हजार नवे रुग्ण आणि साडेतीनशे ते चारशेच्या घरात मृत्युमुखी पडणारे कोरोनाग्रस्त यामुळे दिल्ली बेहाल आहे.
दिल्लीत आतापावेतो ११ लाख ९४ संक्रमित झाले असून १० लाख ८५ हजार लोक संक्रमणमुक्त झाले आहेत. १६,९६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत देशात सर्वाधिक बळी दिल्लीमध्ये गेले आहेत. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि औषधांची कमतरता यामुळे या भीषण संकटात दिल्लीकरांना वाली कोणीच नाही का, असे वातावरण आहे. केंद्राकडून दिल्लीला त्याचा हक्काचा ऑक्सिजनही दिला जात नसल्याची तक्रार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केली आहे आणि दिल्ली सरकारने तसे लेखी दिले आहे. उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला, ‘तुमच्या आवाक्यात येत नसेल तर कोरोना नियंत्रणाची सूत्रे सशस्त्र दलांना द्या', अशी सूचना करून फटकारले होते. त्यानंतर सिसोदिया यांनी संरक्षणमंत्र्यांना मदतीसाठी लष्कराची मदत पुरविण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा: राजधानी दिल्ली : अपेक्षा कार्यक्षम कारभाराची
दरम्यान, लसीकरणाला वेग देऊन दिल्लीतील संसर्ग प्रकोप नियंत्रणात आणण्याची जोरदार धडपड राज्य सरकारने सुरू ठेवली आहे. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम दिलीत खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली. केंद्र सरकारनेही राष्ट्रीय प्रसारमाध्यम केंद्रासह दिल्लीतील अनेक शासकीय इमारतींत विविध घटकांसाठी लसीकरणाची सुविधा करून देण्याचे नियोजन केले आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी दिल्लीतील ७७ सरकारी शाळांमध्येही लसीकरण सुरू करण्याचे दिल्ली सरकारने ठरवले आहे. या शाळांना जवळच्या शासकीय रुग्णालयाशी जोडण्यात आले आहे. सिसोदिया यांनी यातील अनेक केंद्रांची माहिती घेतली. सिसोदिया यांनी यावेळी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
Web Title: Delhi Deputy Cm Manish Sisodiya Call For Military Help Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..