दिल्लीत फेब्रुवारी ठरला गेल्या सात वर्षांतील सर्वांत स्वच्छ हवेचा महिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi air pollution

दिल्लीत फेब्रुवारी ठरला गेल्या सात वर्षांतील सर्वांत स्वच्छ हवेचा महिना

नवी दिल्ली : दिल्लीमधील प्रदुषित हवेचा प्रश्न सातत्याने चर्चेला येतो. दिल्लीची हवा आता आरोग्यदायी राहिली नसल्याने तिची गुणवत्ता सुधारावी, यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत, अशी चर्चा रंगताना सातत्याने दिसून येते. हे मुद्दे सुप्रीम कोर्टामध्येही पोहोचले असून हवेच्या गुणवत्तेबाबत अजून काही ठोस उपाय मिळाला नाहीये. मात्र, असं असलं तरी या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी सध्या समोर आली आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही गेल्या सात वर्षांमधील हवेच्या गुणवत्तेपेक्षा अत्यंत चांगली राहिली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात नेहमीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे हा बदल दिसून आला. (Air Quality Index - AQI)

2016 मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) लाँच झाल्यापासून गेला फेब्रुवारी महिना हा सर्वांत स्वच्छ हवेचा महिना ठरला आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board - CPCB) याबाबतची माहिती दिली आहे.

दिल्लीमध्ये संपूर्ण फेब्रुवारीमध्ये सरासरी 225 AQI नोंदवला गेला आहे. 2020 च्या फेब्रवारी महिन्यामध्ये 241 AQI नोंदवण्यात आला होता. गेल्या महिन्यात दिल्लीमध्ये 29.7 मिमी पाऊस पडला आहे. 2014 मध्ये 48.8 मिमी पाऊस पडला होता तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये 2.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. याच्या दहापट पाऊस यावर्षी नोंदवण्यात आला आहे. दिल्लीमध्ये यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांमध्येच 117.9 मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच दोन महिन्यात (59.2 मिमी) पडलेल्या पावसाच्या दुप्पट पाऊस यावेळी दिसून आला.

टॅग्स :delhiAir Clean