तुमच्याकडे सुपरपॉवर आहे का ? ; सर्वोच्च न्यायालयाचा 'एलजीं'ना सवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्ही म्हणता की माझ्याकडे अधिकार आहेत. मात्र, तुम्हाला काही करायची इच्छाच नाही. तुम्हाला असे वाटते तुमच्याकडे सुपरपॉवर आहे. मी जबाबदार आहे पण मला कोणीही याबाबत विचारू नये, अशा शब्दांत न्यायाधीशांनी ताशेरे ओढले.

नवी दिल्ली : दिल्लीतील कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. त्यानंतर या कचराप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की दिल्लीतील कचराप्रश्न हाताळण्यासाठी तुम्ही कोणतीही महत्वाची पावले उचलली नाहीत. तुमच्याकडे सुपरपॉवर आहे, असे तुम्हाला वाटते का असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ए. बी. लोकूर आणि दीपक गुप्ता या न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिल्लीचा कचराप्रश्न हाताळण्यासाठी दिल्लीच्या नायब राज्यपालांनी याबाबत उत्तर द्यावे, असे सांगितले. या खंडपीठाने नायब राज्यपाल बैजल यांना खडेबोल सुनावले, की तुम्ही म्हणता की माझ्याकडे अधिकार आहेत. मात्र, तुम्हाला काही करायची इच्छाच नाही. तुम्हाला असे वाटते तुमच्याकडे सुपरपॉवर आहे. मी जबाबदार आहे पण मला कोणीही याबाबत विचारू नये, अशा शब्दांत न्यायाधीशांनी ताशेरे ओढले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी कचराप्रश्न हाताळण्यासाठी दिलेल्या कालावधीत काम करण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाने याबाबत खडेबोल सुनावले. 

जर तुम्ही म्हणत असाल महापालिका उत्तर देण्यास बांधील असेल. तर हे स्वच्छ करण्यास किती वेळ लागेल हे आम्हाला सांगा असेही न्यायाधीशांनी सांगितले. 

Web Title: Delhi garbage You think you are superpower but wont do anything