esakal | दिल्लीत दोन्ही लॉकडाउन निष्फळ? मृतांचा राजधानीतील आकडा देशात सर्वाधिक

बोलून बातमी शोधा

Lockdown
दिल्लीत दोन्ही लॉकडाउन निष्फळ? मृतांचा राजधानीतील आकडा देशात सर्वाधिक
sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनच्या दुसऱ्या लाटेत राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन्ही लॉकडाउनच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या भयंकर वेगाने वाढत चालली असून मृतांची संख्याही संपूर्ण देशात सर्वाधिक म्हणजे १५ हजाराच्या पुढे गेली आहे. उपचार सुरु असलेले रुग्ण आढळण्याचा पॉझिटिव्हिटी रेट दिल्लीत तब्बल ३१.७६ टक्के इतका वाढला आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ३० मार्च रोजी सहा दिवसांच्या मिनी लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर रुग्ण संख्या प्रचंड वाढू लागली. त्यातच ऑक्सिजन तुटवड्याचे संकट निर्माण झाले. ते अद्यापही कायम आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग रुग्णांनी भरून गेले आहेत. मृतांची संख्या रोज काही शेकड्यांत झाल्यामुळे स्मशानांमधील विद्युतदाहिनी २४ तास धडधडू लागली.

लॉकडाउन वाढविल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार लॉकडाउन हाच प्रभावी उपाय मानत असेल तर सध्याची परिस्थिती तेवढीच गंभीर आहे. परिणामी तीन मे नंतरही लॉकडाउन वाढवण्याचीच वेळ येणार, अशी चिन्हे आहेत.

हेही वाचा: देशात कोरोनानं २ लाखांहून अधिक मृत्यू; आरोग्य मंत्री म्हणतात भारताचा मृत्यूदर कमीच!

दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या पलीकडे गेली आहे. बहुतेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षताच नव्हे तर कोणत्याच वॉर्डांमध्ये जागा शिल्लक नाही. त्यामुळे दिल्ली सरकारने कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी मैदानांचा वापर सुरु केला आहे. एक मेपासून विस्तारित लसीकरण मोहिमेसाठी सार्वजनिक उद्याने तसेच सभागृहे यांचा वापर करण्याचा निर्णय अमलात आणला जाईल. त्याचप्रमाणे कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचाही निर्णय राज्य सरकारने अमलात आणला आहे. लसीकरण आणि चाचण्या यामध्ये गोंधळ उडू नये यासाठी चाचण्यांची विशेष केंद्रे उभारण्यासही राज्य सरकारने वेग दिला आहे.

लक्षणे सौम्य, प्रकृती मात्र गंभीर

दिल्लीत ज्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले किंवा ज्यांना लक्षणे नाहीत अशा कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्यांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेचे निरीक्षण आहे.