आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या वाहनांवरही लागणार नंबरप्लेट !

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

नंबरप्लेटच्या जागी चार सिंह असलेली मुद्रा असल्याने दहशतवादी किंवा समाजकंटकांकडून संबंधित वाहनांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. 

नवी दिल्ली : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल यांसारख्या देशातील सर्वोच्च संविधानिक पदावरील व्यक्तींच्या वाहनांवर नंबरप्लेट लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे या पदांवरील व्यक्तींच्या वाहनांवर रजिस्ट्रेशन केलेली नंबरप्लेट लवकरच लागल्याचे दिसणार आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल यांसारख्या देशातील सर्वोच्च संविधानिक पदावरील व्यक्तींच्या वाहनांवर नंबरप्लेट लावण्यात यावी, अशी मागणी या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. तसेच नंबरप्लेटच्या जागी चार सिंह असलेली मुद्रा असल्याने दहशतवादी किंवा समाजकंटकांकडून संबंधित वाहनांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे या प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले. 

दरम्यान, या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले, की देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदांवरील व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या वाहनांवर नोंदणीकृत नंबरप्लेट लावणे बंधनकारक आहे. 

Web Title: Delhi HC orders vehicles of President vice president to display registration numbers