दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

लोक येतात आणि जातात.. पण पद कायम राहते. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कृती करत नजीब जंग यांनी नायब राज्यपाल पदाची अवहेलना केली. वैयक्तिक आयुष्यात ते खूपच साधे आणि सज्जन आहेत. पण केंद्राच्या आदेशानुसार ते दिल्लीमध्ये जनमताचा अनादर करत होते.
- कुमार विश्‍वास, 'आप'चे नेते.

नवी दिल्ली: दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी त्यांचा राजीनामा केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यांच्या पदाचा कार्यकाळ आणखी 18 महिने होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा नजीब जंग यांचा विचार आहे. केंद्र सरकारने अद्याप हा राजीनामा मंजूर केलेला नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी यांच्याशी जंग यांचे सातत्याने खटके उडाले. केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने जंग यांना टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जंग राजीनामा देण्याचा विचार करत होते, असेही सूत्रांनी सांगितले. राजीनामा देताना जंग यांनी कोणतेही कारण नमूद केलेले नाही. 65 वर्षीय नजीब जंग हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तसेच, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे ते उपकुलगुरुही होते. 2013 च्या जुलैमध्ये त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपालपद स्वीकारले होते.

केजरीवाल सरकार दिल्लीत सत्तेत आल्यानंतर जंग यांच्याशी त्यांचे सातत्याने खटके उडाले होते. 'केंद्र सरकारचे हस्तक' अशा शब्दांत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर टीकाही होती.

कॉंग्रेसचे नेते संदीप दीक्षित म्हणाले, "कुणाशीही विनाकारण भांडण करण्याचा जंग यांचा स्वभाव नाही. दिल्ली सरकारनेच सातत्याने वाद निर्माण केला.'' 'इतरांप्रमाणेच आम्हालाही या निर्णयाचा धक्का बसला आहे. अखेर राज्य सरकारशी असलेला वाद संपुष्टात आला आहे. त्यांच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी आमच्या शुभेच्छा!' अशी प्रतिक्रिया 'आप'चे नेते कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केली.

Web Title: Delhi Lieutenant Governor Najeeb Jung Submits Resignation