Delhi: शोकाकूल मायावतींच्या सांत्वनाला प्रियांका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi

शोकाकूल मायावतींच्या सांत्वनाला प्रियांका

नवी दिल्ली : मातृशोक झालेल्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची रविवारी भेट घेऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. रामरती देवी (वय ९२) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. गेल्या वर्षी मायावती यांचे वडील प्रभूदयाल यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले होते. दिल्लीत ३, त्यागराज मार्ग या ठिकाणी मायावती यांचे घर आहे. तेथे जाऊन प्रियांका यांनी मायावती यांच्याशी संवाद साधला. प्रियांका यांनी या भेटीचा व्हिडिओही सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला भेटेन असेही त्यांनी भेटीच्या शेवटी सांगितले. राज्यसभेचे खासदार दिपेंदर हुडा हे सुद्धा प्रियांका यांच्यासह उपस्थित होते.

रामरती यांच्या निधनाची वार्ता आल्यानंतर प्रियांका यांनी शनिवारी ट्विट केले होते. देवाने त्यांना आपल्या जवळ स्थान द्यावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे असे प्रियांका यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीमुळे वातावरण तापत आहे. प्रियांका यांनी उमेदवारीत ४० टक्के तिकिटे महिलांना देण्याची घोषणा केली आहे. त्यास मायावती यांनी निवडणुकीपुरते नाटक, असे प्रत्यूत्तर दिले होते.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

केंद्रात आणि विधानसभांमध्ये सत्ता होती तेव्हा महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय काँग्रेसने का घेतला नाही, असा सवालही त्यांनी केला होता. त्यानंतर प्रियांका यांनी हाथरस बलात्कार तसेच लखीमपूर खेरी हिंसाचारावरून मायावती यांनी आवाज उठविला नाही, असे प्रत्यूत्तर दिले होते.

सोनिया, राहुल यांच्याकडूनही सांत्वन

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल यांनीही मायावती यांच्याशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले. सोनिया यांनी मायावती यांना शोकसंदेशही पाठविला.

loading image
go to top