भाजपला 2019 मध्ये अभूतपूर्व यश मिळेल- अमित शहा

पीटीआय
शुक्रवार, 26 मे 2017

अमित शहा म्हणाले

  • देशाच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाढ
  • महागाई घटून विकासदर वाढावा यासाठी प्रयत्न
  • भाजपने राष्ट्रीय राजकारणात बदल घडविले
  • विरोधकच भविष्यात आमच्या जागा वाढवतील
  • ईशान्य, पश्‍चिम भारतात भाजप विजयी होईल

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळेल, 2014 मध्ये मिळालेल्या विजयापेक्षाही हा विजय निश्‍चितपणे मोठा असेल, असा विश्‍वास व्यक्त करतानाच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विविध क्षेत्रांमध्ये भारताचा महान राष्ट्र म्हणून अभ्युदय होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

भाजपला 2014 मध्ये 282 जागा मिळाल्या होत्या; पण 2019 मध्ये आमचा पक्ष यापेक्षाही अधिक जागांवर विजयी होईल. पश्‍चिम बंगाल, केरळ, तेलंगण आणि ओडिशामध्ये आमचा पक्ष मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक चांगली कामगिरी करेल, असे शहा यांनी नमूद केले. तीन वर्षांच्या काळात भारताचा आत्मविश्‍वास, अभिमान आणि महत्त्वाकांक्षेमध्ये कित्येकपटीने वाढ झाली असून, विरोधी पक्ष जातीयवाद, घराणेशाही यांचे उदात्तीकरण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

'यूपीए'च्या काळामध्ये दरमहा एक गैरव्यवहार उघड होत असे, आता सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मोदींवर एकही आरोप करता आलेला नाही. "यूपीए'च्या काळामध्ये प्रत्येक मंत्री हा पंतप्रधान असल्यासारखा वागत होता. आमच्या सरकारने पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा अबाधित ठेवली आहे. हेच पंतप्रधान मोदी यांचे सर्वांत मोठे काम आहे.

Web Title: delhi news bjp bigger victory in 2019 LS polls amit shah claims