Cold Delhi : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा कहर सुरूच

राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात अनेक शहरांत सोमवारी सलग पाचव्या दिवशी थंडीची तीव्र लाट कायम राहिली आणि दृश्यमानताही २५ मीटरपर्यंत घसरली.
Delhi Cold
Delhi Coldsakal

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात अनेक शहरांत सोमवारी सलग पाचव्या दिवशी थंडीची तीव्र लाट कायम राहिली आणि दृश्यमानताही २५ मीटरपर्यंत घसरली. दिल्लीचा पारा शिमला, मसूरी, चंबा, डलहौली, धर्मशाला आणि नैनिताल सारख्या थंड शहरांपेक्षा खाली घसरला. दिल्लीत रविवारी नोंदवले गेलेले १.९ अंश हे किमान तापमान हे दोन वर्षांतील नीचांकी आणि २०१३ नंतर जानेवारी महिन्यातील दुसरे नीचांकी तापमान होते. दिल्लीत पुढील किमान ३ दिवसांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.आज (सोमवारी) तापमानात किंचित वाढ होऊन ते ३.५ अंशावर पोहोचले मात्र थंडगार वाऱयांनी नागरिकांचे कुडकुडणे कायम आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार थंडीने अक्षरशः गोठण्याच्या अवस्थेत पोचलेली दिल्ली आणि उत्तर-पश्चिम भारतातील लोकांना पुढील २४ तासांनंतर किंचित दिलासा मिळू शकतो, परंतु या काळात दाट धुक्याचा पडदा दिल्लीवर कायम राहील. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात सोमवारीही दिवसभर ‘हुडहुडी‘ शब्दही कमी वाटावा इतकी भयंकर थंडी व दाट धुके होते. दमा, ब्राँकायटिस आणि फुफ्फुसाशी संबंधित इतर समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी काळजी घ्यावी व शक्यतो घरांतच थांबावे. बाहेर पडल्यास त्यांना श्वसनाचा मोठा त्रास होऊ शकतो असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पहाटे दृश्यमानता शून्यावर पोहोचली. दिल्लीच्या सफदरजंग वेधशाळेत सोमवारी दिवसाचे किमान तापमान ३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

दाट धुक्यामुळे आणखी अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांना सावकाश वाहन चालवण्यास आणि 'फॉग लाइट' वापरण्यास सांगितले आहे. विमाने आणि रेल्वेसोवांवरही दाट धुक्याचा प्रतीकूल परिणाम झाला. गेल्या २४ तासांत दिल्लीकडे येणाऱया व जाणाऱया ८२ एक्सप्रेस आणि १४० पॅसेंजर गाड्या आणि ४० उपनगरीय गाड्यांसह २६० गाड्या रद्द करण्यात आल्या. धुक्यामुळे रविवारी ३३५ गाड्या उशिराने धावत होत्या, ८८ रद्द करण्यात आल्या होत्या आणि ३१ गाड्या वळवण्यात आल्या होत्या.

धुक्यामुळे किमान पाच विमाने दिल्लीहून इतरत्र वळवण्यात आली तर ३० उड्डाणांना तासनतास उशीर झाला. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीतील शाळांमधील हिवाळी सुट्टीचा कालावधी वाढवण्यात आली आहेत. गोठवणाऱ्या थंडीमुळे रस्त्यांवरच निवारा असलेल्या गोरगरीबांचे प्रचंड हाल होत आहेत. जागोजागी, रस्त्यारस्त्यांवर शेकोट्या पेटवून लोक उब मिळविण्याची धडपड करत आहेत.

गोठलेल्या दिल्लीमधील किमान तापमानाने थंड हवेची म्हणून प्रसिध्द असणाऱया शहरांनाही यंदा मागे टाकले आहे. चंबा (८.७ अंश सेल्सिअस), डलहौसी (९), धर्मशाला (९.२), शिमला (१०.३),मनाली (६), कांगडा (८.९), डेहराडून (६.५), मसूरी (११.३), नैनिताल (६ ), मुक्तेश्वर (७.६) आणि टिहरी (९.२) यसारख्या थंड हवेच्या शहरांपेक्षा दिल्लीतील पारा आजही कमी राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com