सरकारी नोकरीच्या आमिषाने तब्बल 27 हजार जणांची फसवणूक; पोलिसांनी केली पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

संशयित आरोपींनी बनावट सरकारी वेबसाइट तयार केली होती. त्यावरून 13 हजार सरकारी नोकऱ्यांची जाहीरात देण्यात आली होती.

नवी दिल्ली - सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूकीचे प्रकार सातत्याने घडतात. आता दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर सेलने सरकारी नोकरीमध्ये मोठा घोटाळा (job scam) करणाऱ्या पथकाचा पर्दाफाश केला आहे. 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी नोकरी देण्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करायचे. या गँगने आतापर्यंत 27 हजार जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं संकेतस्थळ तयार करून फसवणूक केली जात असे अशी  माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे पोलिस उपायुक्त अन्येश रॉय यांनी सांगितेल की, संशयित आरोपींनी बनावट सरकारी वेबसाइट तयार केली होती. त्यावरून 13 हजार सरकारी नोकरीची जाहीरात देण्यात आली होती. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच बँक खात्यांमधील 49 लाख रुपये, 3 लॅपटॉप आणि 7 मोबाइल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

हे वाचा - व्याजावर व्याजापासून अखेर सुटका; बँकांनी पैसे खात्यात टाकायला केली सुरवात

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिस या प्रकऱणी आरोपींची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडे चौकशी सुरू केली असून त्यांच्याकडून आणखी काही धागेदोरे सापडतात का हे तपासलं जात आहे. आरोग्य विभागाच्या बनावट वेबसाइटवरून करण्यात आलेल्या फसवणुकी प्रकरणी अद्याप आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police bust job scam over 27 thousand victim